esakal | भाग दोन :  नंदगिरी किल्ल्याला आहे दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

लोक परंपरेने जोपासलेल्या आठवणी आजही ताज्या आहेत. शीला लेखातून आणि ताम्रपत्रातून लिहून ठेवलेले ऐतिहासिक वास्तवही आपल्या समोर आहे. दोन हजार वर्षाच्या स्मृती उराशी बाळगून आजही ताठ मानेने उभी असलेली वास्तू म्हणजे नांदेडचा किल्ला जो परंपरेने नंदगीरी किल्ला म्हणून ओळखला जातो.

भाग दोन :  नंदगिरी किल्ल्याला आहे दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड :  दोन हजार वर्षाच्या वाटचालीचा इतिहास असलेल्या नांदेडच्या प्राचीन इतिहासाचा वारसा जोपासणाऱ्या काही मोजक्याच ऐतिहासिक वास्तू आधुनिक नांदेडात आज शिल्लक आहेत. त्यापैकीच एक आहे गोदावरी नदीच्या काठावरील नंदगिरी किल्ला. 

नंदगीरी ही सातवाहनाच्या राजधानी पैकी एक नगरी होती. त्या नगरीची स्मृती लोकपरंपरेने नांदेडच्या किल्ल्याच्या नावातून जोपासली जात आहे. लोकपरंपरा या काल्पनिक नसतात. त्याला मुळाशी कुठेतरी ऐतिहासिक वास्तवाची झालर असते हे विसरून चालणार नाही. ज्या गोदाकाठी नंदगीरीच्या किल्ला उभा आहे. त्याच काठावर विष्णुपुरी परिसरातील टेकड्यावर सातवाहनकालीन अवशेष सापडले आहेत. नंदगीरी किल्ल्याचा तटबंदीतही सातवाहनकालीन विटांचे तुकडे ज्येष्ठ पत्रकार दिवंगत सुधाकरराव डोईफोडे यांना सापडले होते. विशेष म्हणजे पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनीही त्याला दुजोरा दिला होता.

हे वाचा -  `या’ कर्मचाऱ्यांच्या मानसिक तणावात होतेय वाढ

किल्ला मनपाच्या पाणी विभागाच्या ताब्यात
महाराष्ट्रात बऱ्याच मोठ्या प्रमाणात भुईकोट किल्ले आहेत. पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि नाशिकचा भाग वगळला, तर इतर सर्व भागांमध्ये बहुतांश किल्ले भुईकोट आहेत. पूर्वीच्या काळी अनेक शहरांची ओळख तिथल्या भुईकोट किल्ल्यावरून होती. त्यातीलच एक किल्ला म्हणजे नांदेडचा नंदगिरी अर्थात नंदीग्राम किल्ला.  नांदेड शहराचे नाव याच किल्ल्यावरून पडल्याचे इतिहास सांगतो. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हा किल्ला वसलेला आहे.  मात्र आज किल्ल्याची अतिलशय दुरावस्था झलेली आहे.  गोदावरीच्या काठावर आज हा किल्ला भग्नावस्थेत उभा आहे.  महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राचे किल्ले अंगाखांद्यावर खेळवत आहेत, परंतु भुईकोट किल्ल्यांचा इतिहास नामशेष होत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.  आज नांदेडचा नंदगिरी किल्ला महानगरपालिकेच्या पाणी विभागाच्या ताब्यात आहे. 

१४ पैकी नऊच बुरूज उरलेत
महाराष्ट्रात काही किल्ले हे आज केवळ नाममात्र किंवा त्यांचे अवशेष दाखवण्यापुरते उरले आहेत. अशा अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला म्हणजे नांदेडचा किल्ला. गोदावरी नदीकाठी वसलेल्या नांदेड शहरात नदीच्या उत्तर तीरावर नंदगिरी किल्ला होता. आज या किल्ल्याचे नांदेड शहराच्या जुन्या भागात अरब गल्ली येथे गोदावरीच्या पात्रालगत काही अवशेष उरले आहेत. नांदेड शहर रस्ते आणि रेल्वे मार्गाने संपुर्ण देशाशी जोडलेले असल्याने येथे येण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. नांदेडहून रिक्षाने अरब गल्लीत असलेल्या किल्ल्यापर्यंत जाता येते. ग्याझेटमधील नोंदीनुसार कधीकाळी य़ा भुईकोट किल्ल्याला दुहेरी तटबंदी होती.  त्यात २४ बुरुज होते. त्यापैकी १४ बुरुज बाहेरच्या तटबंदीत तर १० बुरुज आतील तटबंदीत होते. आज मात्र किल्ल्याच्या तटबंदीत केवळ नऊ बुरुज उरलेले असुन त्यापैकी किल्ल्याचे पाच बुरुज आणि तटबंदी बाहेरुन दिसतात. उरलेले चार बुरुज गडफेरी करताना आतील बाजूने लक्षात येतात. 

हेही वाचलेच पाहिजे - हात जोडतो, घोडचूक करू नका : आमदार धीरज देशमुख यांचे आवाहन

मनपाने किल्ल्याची शान घालवली
अरब गल्लीतुन दिसणाऱ्या नांदेड महानगरपालिकेने बांधलेल्या दोन टाक्यांच्या दिशेने गेल्यावर आपला किल्ल्याच्या सध्याच्या अवशेषांच्या आत प्रवेश होतो. किल्ल्यात जेथुन प्रवेश होतो त्या ठिकाणी महानगरपालिकेने दोन सिमेंटचे छोटे बुरूज बांधलेले असुन तेथे लोखंडी दरवाजा लावलेला आहे. हा दरवाजा सकाळी नऊ ते संध्याकाळी सात या वेळेतच उघडा असतो. या लोखंडी दरवाजातून आत आल्यावर समोरच पाण्यांच्या टाक्यांच्या बाजूला किल्ल्याची माहिती देणारा फ़लक पुरातत्व खात्याने लावला आहे. किल्ला पुरातत्व विभागाच्या ताब्यात असूनही नांदेड महानगरपालिकेने किल्ल्यात शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या दोन मोठया टाक्या आणि विश्रामगृह बांधून किल्ल्याची शान घालवली आहे.

loading image
go to top