esakal | धक्कादायक : नांदेडला आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला...
sakal

बोलून बातमी शोधा

nanded news

४२ वर्षीय पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भोसीकर आणि महापालिकेचे डॉ. बिसेन यांनी दिली.

धक्कादायक : नांदेडला आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : नांदेडच्या पीरबुऱ्हाणनगरमध्ये बुधवारी (ता. २२) पहिला रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आता चार दिवसांनी रविवारी (ता. २६) रात्री दुसरा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून त्या बाबतच्या पुढील प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने सुरू करण्यात आल्या आहेत.

या बाबत माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी व महापालिका कार्यालयात संपर्क साधला. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, महापालिकेचे प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंह बिसेन, उपायुक्त अजितपालसिंघ संधू आदींच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात रात्री नऊ वाजता बैठक सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

हेही वाचा - भयानकच : सुनेनेच केला वयोवृद्ध सासूचा खून, काय आहे कारण? ते वाचाच

शहरातील अबचलनगर भागातील चारजण पंजाबला गेले होते. ते परत आल्यानंतर त्यांच्या स्वॅबच्या तपासणीत एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर तिघांचा निगेटिव्ह आला असल्याची माहिती मिळाली आहे. ४२ वर्षीय पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भोसीकर आणि महापालिकेचे डॉ. बिसेन यांनी दिली.

आत्तापर्यंत १७ हजार ४८२ व्यक्तींची तपासणी
नांदेडला एक कोरोनाबाधित रुग्ण असल्याने व त्याच्या सहवासातील जवळपास ८० संशयितांचा अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना घाबरून जाऊ नका, अफवांवर विश्वास ठेवू नका, पण खबरदारी आणि काळजी घ्या, असे आवाहन केले आहे. दरम्यान, पीरबुऱ्हाणनगर कंटेंटमेंट क्षेत्रातील चार हजार १०७ घरांमधील १७ हजार ४८२ व्यक्तींची ताप, सर्दी, खोकला आदींची थर्मल मशीनद्वारे तपासणी रविवारी (ता. २६) करण्यात आली.

४९ संशयितांच्या घशातील लाळेचे स्वॅब घेतले
शनिवारी आणि रविवारी सलग ४९ संशयितांच्या घशातील लाळेचे स्वॅब (नमुने) तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. कोरोना संशयित व्यक्तींची संख्या वाढत असली तरी त्यांच्या ‘स्वॅब’ तपासणीत ‘कोरोना’ची कुठलीही लक्षणे आढळून येत नसल्याने जिल्हा प्रशासनाने त्या कोरोनाबाधित रुग्णास कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. लवकरच त्या रुग्णाची दुसरी चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्राने दिली. कोरोनाबाधित रुग्णावर विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या रुग्णास उच्च रक्तदाब, मधुमेह आणि श्वसनाचा त्रास असल्याचे सांगण्यात आले.

अशी आहे जिल्ह्यातील रविवारची स्थिती

 •  एकूण पॉझिटिव्ह रुग्ण - एक
 • आतापर्यंत एकूण क्वारंटाइन - ८६३
 • क्वारंटाइन कालावधी पूर्ण - २७५
 • अजून निरीक्षणाखाली असलेले - ११०
 • त्यापैकी दवाखान्यात क्वारंटाइनमध्ये - ४२
 • घरीच क्वारंटाइनमध्ये असलेले - ८२१
 • आज तपासणीसाठी नमुने घेतले - ३९
 • एकूण नमुने तपासणी - ६८८
 • त्यापैकी निगेटिव्ह - ६२९
 • नमुने तपासणी अहवाल बाकी - ५३
 • जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी ८१ हजार ९६ असून त्यांना त्यांच्या घरीच राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले असल्याची माहिती नांदेडच्या आरोग्य विभागाने दिली.