‘आपले सरकार’चा वापर करणे ही काळाची गरज

जयपाल गायकवाड
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

वेबपोर्टलची संरचना
तीन महत्त्वाच्या घटकांना या वेबपोर्टलमध्ये सहभागी करण्यात आले आहे.
तक्रार निवारण- नागरिकाला आपली तक्रार उचित प्रवर्गाखाली दाखल करता येईल. त्यानंतर नागरिकाला दाखल केलेल्या तक्रारीचा टोकन क्रमांक मिळेल. त्या क्रमांकाचा वापर करून तक्रारीची सद्य:स्थिती जाणून घेता येईल.

नांदेड : सरकारी कार्यालयात एखादे काम करायचे असल्यास नागरिकांच्या कपाळावर आठया पडतात. कारण कोणत्या कामाला किती दिवस लागतील व हेलपाटे मारावे लागतील याची त्यांना शाश्वती नसते. आता माहिती तंत्रज्ञानाने हे चित्र पालटले आहे. नागरिकांनी सरकारी वेबसाईट ‘आपले सरकार’चा उपयोग करून घेतल्यास त्यांचे मोठे श्रम वाचू शकतात.

‘आपले सरकार’ वेबपोर्टल काय आहे?
राज्यातील जनतेचा थेट मंत्रालयाशी संपर्क साधणारी ही ऑनलाइन व्यवस्था आहे. मोबाइल आणि कॉम्प्युटरच्या माध्यमातून दुहेरी संवादाचे हे माध्यम असून ‘प्रतिसाद’ देण्याच्या माध्यमातून शासन यामध्ये जनतेप्रति ‘दायित्व’ पूर्ण करते. मुख्यमंत्री कार्यालयाकडून या पोर्टलचे नियंत्रण केले जाणार आहे. प्रतिसादाची हमी हे पोर्टलचे वैशिष्टय आहे. मुख्यमंत्र्यांपर्यंत मागणी, सूचना यांची दखल घेतली जाणार आहे. प्रत्येक विभागाचा एक अधिकारी या संदर्भात जबाबदार असेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सामान्य माणसाला मंत्रालयाचे हेलपाटे करावे लागणार नाहीत. पोर्टलद्वारे नागरिकांना आपल्या तक्रारी ऑनलाइन दाखल करणे तसेच त्याची सद्य:स्थिती जाणून घेण्याची सुविधा असल्यामुळे मंत्रालयापर्यंत येण्याची आवश्यकताच भासणार नाही.

वेबपोर्टलची संरचना
तीन महत्त्वाच्या घटकांना या वेबपोर्टलमध्ये सहभागी करण्यात आले आहे.
तक्रार निवारण- नागरिकाला आपली तक्रार उचित प्रवर्गाखाली दाखल करता येईल. त्यानंतर नागरिकाला दाखल केलेल्या तक्रारीचा टोकन क्रमांक मिळेल. त्या क्रमांकाचा वापर करून तक्रारीची सद्य:स्थिती जाणून घेता येईल.

माहितीचा अधिकार- मंत्रालयीन विभागाकडे माहितीच्या अधिकाराखाली करावयाचा अर्ज अथवा प्रथम अपील या भागामध्ये दाखल करता येणार असून त्याचे शुल्क (फी) इंटरनेट बँकिंग,डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड यांचा वापर करून अदा करता येईल.
सहयोग- सुशासनाच्या संकल्पनेला चालना देण्याकरिता आणि नागरिकांचा प्रशासनात सहभाग वाढविण्याकरिता जनतेकडून शासनाच्या धोरणाबाबत सूचना, अभिप्राय मिळवण्याकरिता पोर्टलच्या या भागाचा उपयोग होईल. जनतेला आपल्या सूचना, अभिप्राय पोर्टलच्या या भागात दाखल करता येतील.

सर्वसाधारण सार्वजनिक सेवा, सर्व मंत्रालयीन विभागाचे कामकाज याविषयीच्या तक्रारी या वेबपोर्टलवर नोंदविता येतील. त्याचबरोबर सर्व विभागीय तसेच जिल्हास्तरीय कार्यालयांचा समावेशही वेबपोर्टलवर लवकरच करण्यात येणार आहे.

वापर कसा करावा
काही वर्षापूर्वी ‘अप्रगत’ म्हणून शिक्का बसलेल्या आपल्या देशात जागतिकीकरणाच्या रेटयाने तसेच सरकारी पातळीवर घेतलेल्या निर्णयांमुळे माहिती तंत्रज्ञानाचा वाढता वापर सुरू झाला. त्यानंतर संपूर्ण देशाचे चित्र पाहता पाहता बदलत गेले. अनेक सेवा ऑनलाईन पद्धतीने मिळू लागल्या. परंतु बहुतेक राज्य सरकारे याबाबतीत बरीच मागे होती. या पद्धतीचे महत्त्व आता त्यांनाही कळून आले असून त्यांनीही कंबर कसून कामाला सुरुवात केली आहे.

देशातील सर्वाधिक ‘प्रगत राज्य’ म्हणून गणला गेलेला महाराष्ट्र याबाबतीत मागे कसा असेल? म्हणूनच महाराष्ट्र सरकारने सरकारी कामकाजाबद्दलची माहिती मोठया प्रमाणावर जनतेपर्यंत पोहोचावी या उद्देशाने aaplesarkar.mahaonline.gov.in हे संकेतस्थळ सुरू केले आहे. त्यावर सेवा हमी कायदा, तक्रार निवारण, माहितीचा अधिकार आणि जनतेच्या सूचनांसाठी माझे सरकार असे चार पर्याय तयार केले आहेत.

या सेवांचा लाभ घेता येतो
आपल्याला ज्या सेवांचा लाभ घेता येऊ शकतो त्यापैकी काही महत्त्वाच्या सेवा महसूल विभागांतर्गत वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र, मिळकतीचे प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, सांस्कृतिक कार्यक्रम परवाना, प्रमाणित नक्कल मिळणेबाबत अर्ज, अल्पभूधारक शेतकरी असल्याचे प्रतिज्ञापत्र, भूमिहीन प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, ग्राम व पंचायत राज विभागांतर्गत जन्म, मृत्यू, विवाह नोंदणी दाखले, रहिवाशी प्रमाणपत्र, दारिद्रय़ रेषेखाली असल्याचा दाखला, हयातीचा दाखला, कामगार विभागांतर्गत दुकाने आणि आस्थापना नोंदणी व नूतनीकरण इत्यादी सेवा ऑनलाईन पद्धतीने देण्यात येतात. याव्यतिरिक्त जलसंपदा विभाग, शासन मुद्रण लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय (नाव, जात, धर्म, इत्यादीत बदल करणे), कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग (नोकरीसाठी नोंदणी), वन विभाग, नोंदणी व मुद्रांक विभाग, सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभाग (सहकारी संस्थांशी संबंधित), सार्वजनिक आरोग्य विभाग, विधी व न्याय विभाग, गृह विभाग, परिवहन विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका, म्हाडा, गृहनिर्माण, अशा अनेक विभागांच्या सेवांचा लाभ घेता येतो.

Web Title: Nanded news Aaple sarkar portal