गेवराई - महामार्गावरील अपघातात मृत्युंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेवराईच्या गढी येथील प्राणांकित अपघातानंतर त्याच्या विश्लेषणात्मक अहवालात अनेक गंभीर बाबी निदर्शनास आल्या आहेत, सर्वोच्च न्यायालयाने अपघाताची गंभीर दखल घेतली..त्यावरही केवळ समित्यावर समित्या स्थापन करण्याचे काम करून प्रशासन फक्त कागदी घोडे नाचवत आहे. प्रशासन महामार्गावरील किती जणांच्या मृत्युची वाट पाहणार आहे ? असा सवाल गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी आज विधानसभेत उपस्थित केला..अपघातातील मृत्यु पावलेल्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करा, निश्चित केलेल्या ब्लॅकस्पॉट बाबत सत्वर कार्यवाही करा, उड्डाण पुलांची कामे सुरु न करणाऱ्या कंत्राटदाराविरुध्द कारवाई करा आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्याची मागणी आमदार पंडित यांनी आज लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून सभागृहात केली. मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी या बाबत सकारात्मक उत्तर देवून पंडित यांच्या मागणीनुसार योग्य उपाय योजना करण्याचे आश्वास दिले..मे महिन्यातील २६ तारखेला गेवराईतील गढी येथील उड्डाण पुलावर झालेल्या प्राणांकित अपघातात सहा जणांचा मृत्यु झाला, हा गंभीर विषय आमदार विजयसिंह पंडित यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून विधानसभेत उपस्थित केला.यावेळी बोलताना ते म्हणाले की, अपघातानंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या विश्लेषणात्मक अहवालात अनेक गंभीर बाबी समोर आल्या असून जय भवानी सहकारी साखर कारखान्याच्या समोरील उड्डाण पुल तांत्रिकदृष्ट्या योग्य नसल्याचे या अहवालात नमुद करण्यात आले आहे..अहवाल आल्यानंतरही प्रशासनाने कार्यवाही केली नाही. जिल्हाधिकाऱ्यांकडे या गंभीर विषयी चर्चा करण्यासाठी बैठक घेण्याची विनंती केली होती, मात्र त्यांनी या बाबीकडे दुर्लक्ष केले. मात्र सर्वोच्च न्यायालयाने प्रकरणाची दखल घेतल्यानंतर गेंड्याची कातडी पांघरून बसलेल्या प्रशासनाला जाग आली.त्यांनी कागदी घोडे नाचवून समित्यावर समित्या गठीत करण्याचे काम केले. या महामार्गावर सतत अपघात होणारे ब्लॅकस्पॉट निश्चित झालेले असताना त्यात सुधारणा करण्याचे काम संबंधित विभाग का करत नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला..गेवराई विधानसभा मतदार संघातील जाणारे धुळे-सोलापूर आणि कल्याण-विशाखापट्टणम् या दोन्ही राष्ट्रीय महामार्गावर रस्ते अपघातात मृत्युमूखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महामार्गावरील सिरसदेवी सारख्या मोठ्या गावाच्या ठिकाणी पावसाळ्यात अक्षरशः तलावाचे स्वरुप प्राप्त होते. याठिकाणी आजवर दहा ते अकरा जणांचा अपघात झाला आहे..सातत्याने पत्रव्यवहार करूनही केवळ काम मंजुर आहे, टेंडर होताच काम सुरु होईल अशा प्रकारची आश्वासने मिळतात मात्र प्रत्यक्षात काम होत नाही, ही वस्तुस्थिती असल्याचे आ. विजयसिंह पंडित यांनी सभागृहात सांगितले. गेवराई शहराच्या लगत दोन्ही बाजूच्या प्रवेशिकेवर उड्डाण पुलांची कामे मंजुर आहेत..अग्रवाल नावाच्या कंत्राटदाराला ही कामे मिळाली असून ता ३१ मार्च रोजी त्याची मुदत पूर्ण झाली आहे असे असतानाही त्यांनी कामे सुरु केली नाहीत, या कंत्राटदाराविरुध्द शासन कोणती कारवाई करणार आहे? असा प्रश्न आ. पंडित यांनी यावेळी उपस्थित केला. रस्ते अपघातात मृत्युमूखी पडलेल्या सहा जणांच्या वारसांना शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.