नैसर्गिक रंगांचीच होणार उधळण

Dhulivandan
Dhulivandan

हिंगोली : धुलीवंदन सण दोन दिवसांवर आला आहे. यानिमित्त बाजारात विविध रंग उपलब्ध झाले असले तरी चीनमधून येणाऱ्या रंगाची दहशत नागरिकांत आहे. यावर विक्रेत्यांनी नैसर्गिक रंग व पाण्याशिवाय लागणारा रंगही बाजारात उपलब्ध करून दिला आहे, असे असले तरी कोरोना विषाणूचे सावट मात्र या सणावर असल्याचे दिसून येत आहे.

धुलीवंदन सण दोन दिवसांवर आला आहे. बाजारात विविध रंग, पिचकाऱ्या विक्रीस उपलब्ध झाल्या आहेत. शहरात अनेक ठिकाणी विक्रेत्यांनी दुकाने देखील उभारली आहेत. मात्र यावर्षी कोरोना विषाणूमुळे अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. हा विषाणू सर्वत्र पसरत असल्याची भीती नागरिकांत आहे. चीनमधून विक्रीस आलेल्या वस्‍तूंची भीती निर्माण झाल्याने रंगाच्या विक्रीवर थोडाफार परिणाम जाणवत आहे. 

साधे रंग विक्रीस उपलब्ध

धुलीवंदन सणासाठीचे रंगी- बेरंगी फुगे, रंग चीन देशामूधन येतात. त्यामुळे आपल्यालाही कोरोनाची लागण होऊ शकते, अशी भीती नागरिकांतून व्यक्त केली जात आहेत. तसे सोशल मीडियावरून एकमेंकांना संदेश पाठविले जात आहेत. विक्रेत्यांनी मात्र नैसर्गिक रंग, साधे रंग विक्रीस उपलब्ध केले आहेत. 

पिचकाऱ्यांची खरेदी मंदावली

विशेष म्‍हणजे पाण्याशिवाय वापरता येणारे पावडर रंग, त्‍वचेसाठी सुरक्षित असणारे रंग यासह मुलांना डोक्‍याला लावण्यासाठी हेअर कलरचे शो-पीस विक्रीसाठी आले आहेत. ६० ते ५०० रुपयांपर्यत त्‍याचे भाव आहेत. तसेच विविध पिचकाऱ्या देखील विक्रीस आल्या आहेत. चीनमधील पिचकाऱ्यांची खरेदी मंदावली आहे.

नैसर्गीक रंगाची खरेदी करावी

यावर्षी कोरोना व्हायरसची भीती रंगाच्या बाबतीत दाखविली जात आहे. मात्र चीनी रंगाऐवजी नैसर्गीक रंग बाजारात विक्रीस आले आहेत. यात सुंगधी गुलाल व साधे रंग देखील आहेत. त्यामुळे चीनी रंगाची भीती न बाळगता नैसर्गीक रंगाची खरेदी करावी व धुलीवंदन साजरे करावे.
- सय्यद शौकत, विक्रेते


नागनाथ मंदिराची दिवसातून तीन वेळा स्‍वच्‍छता

औंढा नागनाथ : कोरोना विषाणूने भारतातही दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. आता ही दहशत आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या नागनाथ मंदिरामध्ये पोचली आहे. कोरोना विषाणूच्या भीतीने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्याही मंदावली आहे. त्यामुळे दिवसभरातून तीन वेळा मंदिराची स्‍वच्‍छता केली जात आहे.

मंदिर प्रशासनाच्यावतीने खबरदारी

कोरोना विषाणूच्या भीतीने नागनाथ मंदिरात नेहमी प्रमाणे असणारी वर्दळ पहावयास मिळत नसल्याचे चित्र आहे. भाविकांसाठी लावलेले बॅरिकेटस आणि मंदिर परिसरात शुकशुकाट जाणवत आहे. विषाणूचा संसर्ग होऊ नये, म्हणून मंदिर प्रशासनाच्यावतीने खबरदारी बाळगण्यात येत आहे. शुक्रवारी (ता.सहा) सकाळीच संस्थांनच्या सहसचिव विद्या पवार, अधीक्षक वैजनाथ पवार, व्यवस्थापक शंकर काळे, सुरक्षा रक्षक बबन सोनवणे, पंडित काळे यांनी मदिरात प्रवेश करणाऱ्या भाविकांना जंतुनाशक पदार्थाने हात धुण्यास सांगितले त्‍यानंतर मंदिरात प्रवेश देण्यात आला.

राज्यातील भाविक होतात दाखल

 विशेष म्हणजे नागनाथ मंदिराच्या दर्शनासाठी जिल्ह्यासह राज्यातील भाविक येत असतात. त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याची खबरदारी प्रशासनाच्या वतीने घेण्यात आली आहे. आतापर्यंत दिवस कोरोना विषाणू भारताच्या बाहेर थैमान घातले होते. परंतु, आता अनेक जण गर्दीच्या ठिकाणी जाण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे. नागनाथ मंदिरात जंतुनाशक पदार्थ वापरून संपूर्ण मंदिर व परिसर स्वच्छ करण्यात येत आहे. दिवसभरातून तीन वेळा स्वच्छता केली जात असल्याचे संस्थांनच्या सहसचिव विद्या पवार यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com