
केळी जर फ्रीजरमध्ये ठेवली तर ती पिकण्याची प्रक्रिया मंदावते. त्यामुळे त्याची साल काळी पडते.
औरंगाबाद - सध्या बाजारात शंभर टक्के नैसर्गिकरीत्या पिकविलेली फळे मिळतील, याची खात्री मिळूच शकत नाही, अशी स्थिती आहे. वाढती मागणी आणि उपलब्ध तंत्रज्ञानाच्या जोरावर कमीत कमी वेळेत फळे पिकवत ग्राहकांच्या माथी मारण्याचा उद्योग जोरात सुरू आहे. यामध्ये फ्रीजरमध्ये केळी पिकविणे हे काम मोठ्या प्रमाणात केले जात आहे. त्यामुळे अशी केळी दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस चांगली राहू शकत नाहीत; तसेच ती आरोग्यास चांगली असतील असेही सांगता येत नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
केळी जर फ्रीजरमध्ये ठेवली तर ती पिकण्याची प्रक्रिया मंदावते. त्यामुळे त्याची साल काळी पडते. याउलट केळी फ्रीजमध्ये न ठेवता बाहेर ठेवल्यास जास्त वेळ ती चांगली राहू शकते. असे असले तरी नैसर्गिक पद्धतीला फाटा देत रासायनिक पद्धतीनेच केळी पिकविण्याचा प्रकार सर्रास सुरू आहे. अशा केळीवर नजर गेली की वाटते लगेच ही केळी घ्यावी. मात्र, तिची हवी तशी चव लागत नाही. यावरूनच ती रासायनिक पद्धतीने पिकविली असल्याचे लक्षात येते.
शहरातील बहुतांश भाजीपाला विक्रेते सोबतच केळीही विक्रीसाठी ठेवतात. तर काही ठिकाणी स्वतंत्र केळीचा हातगाडाच असतो. या ठिकाणी डझनावर केळी विकली जाते, तर मॉलमध्ये ठेवण्यात आलेली केळी ही किलोवर विक्रीस ठेवलेली असते. ज्योतीनगर येथील एका केळी विक्रेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, की मी अनेक वर्षांपासून केळीच विकतो. मात्र, पिकविण्याची पद्धत बदलली असल्याने पहिल्यासारखा गोडवा राहिलेला नाही. लोकांना देखील आता दिखाव्याचा माल लागतो. त्यासाठी विविध कंपन्यांनी केळीला चांगला कलर येण्यासाठी औषधी बाजारात आणलेली आहेत. आता नैसर्गिक केळी मिळणे अवघड आहे.''
ठळक मुद्दे...
सध्या बहुतांश ठिकाणी सफरचंदला चोपडेपणा किंवा चकाकी दिसून येते. ती नैसर्गिकरीत्या आलेली चकाकी नसते. त्यासाठी ग्रीसचा वापर केला जातो. सफरचंदला ग्रीस लावल्यानंतर कपड्याने घासले जाते. यामुळे ते चमकायला लागते. हे पाहून ग्राहक आकर्षित होतात. मात्र, असे ग्रीस पोटात गेल्याने गंभीर आजाराची लागण होऊ शकते.
- सागर साळुंके, फळ अभ्यासक.
रासायनिक पद्धतीने पिकविलेली फळे बाजारात येत असल्यामुळे अशी फळे लहान मुलांना द्यावी की नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नैसर्गिक पद्धतीने पिकविलेली फळे खऱ्या अर्थाने आरोग्यासाठी चांगली असतात. त्यामुळे अशा फळांसाठी जास्तीचे पैसे खर्च झाले तरी चालतील.
- सुनीता सोनटक्के, गृहिणी.