Vidhan Sabha 2019 : बळीराजा वाचवायचा असेल तर सरकसकट कर्जमाफीची गरज - पवार (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 October 2019

भाजपची संकुचित मनोवृत्ती आहे. कर्जासाठी शेतकऱ्यांच्या घरावर जप्ती येते. त्यामुळे समाजात मानहानीच्या भितीने शेतकरी आत्महत्या करतात. पाच वर्षांत १६ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी उद्योगपतींच्या मागे राहते.

अंबाजोगाई : भाजपची संकुचित मनोवृत्ती आहे. कर्जासाठी शेतकऱ्यांच्या घरावर जप्ती येते. त्यामुळे समाजात मानहानीच्या भितीने शेतकरी आत्महत्या करतात. पाच वर्षांत १६ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी उद्योगपतींच्या मागे राहते. केंद्र सरकारने बड्या उद्योगपतींचे ८१ हजार कोटी रुपयांचे कर्ज रिझर्व्ह बँकेकडून पैसा घेऊन फेडल्याचा आरोप करत बळीराजा वाचवायचा असेल तर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

अंबाजोगाई येथे शुक्रवारी प्रचार सभेत पवार बोलत होते. उमेदवार आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, उमेदवार पृथ्वीराज साठे, माजी मंत्री पंडितराव दौंड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकीशोर मोदी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, नगराध्यक्षा रचना मोदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, सकाळ, दुपार, संध्याकाळी विरोधकांना केवळ आपणच दिसत आहोत. झोपेतही सारखं माझ नाव घेऊन चावळत असतील. शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी यावर उत्तर नसल्याने ३७० कलम पुढे केले जात असल्याचा आरोपही शरद पवार यांनी केला. तुमचे पैलावन आहेत तर केंद्रातील नेत्यांची महाराष्ट्रात जत्रा कशाला. महाराष्ट्रात सत्ता परिवर्तनाची गरज आहे. परळीची चर्चा राज्यात असून ही जागा जाणार असल्याचे लक्षात आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणल्याचेही शरद पवार म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader Sharad Pawar Rally in Ambajogai