esakal | सहकारी साखर कारखानदारी टिकवण्यासाठी सामुहिक प्रयत्नाची गरज
sakal

बोलून बातमी शोधा

basavaraj patil

सहकारी साखर कारखानदारी टिकवण्यासाठी सामुहिक प्रयत्नाची गरज

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा : सहकारी संस्थामुळे राज्याच्या विकासाला प्राधान्य मिळाले. सहकारी संस्थात लोकसहभाग महत्वाचा असल्याने अनेकांना हक्क पोहचतो, परंतू अलीकडच्या काळात सहकारी संस्थांचे खाजगीकरण झाल्याने अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. मात्र सहकारी तत्वावरील साखर कारखान्यावरचा सभासदांचा विश्वास आणि हक्क कायम असल्याने येणाऱ्या काळातही सहकारी साखर कारखानदारी टिकवण्यासाठी सामुहिक प्रयत्नाची गरज आहे असे मत माजी मंत्री तथा विठ्ठलसाई साखर कारखान्याचे अध्यक्ष बसवराज पाटील यांनी व्यक्त केले.

मुरुम (ता.उमरगा) येथील विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचा २०२०-२१ या हंगामासाठी बॉयलर अग्नीप्रदिपन सोहळा रविवारी (ता.१०) श्री. पाटील यांच्या हस्ते झाला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत साखर कारखान्याविषयी माहिती सांगितली. साखर कारखानदारीसमोर सध्या अनेक आव्हाने आहेत, त्यातुनही मार्ग काढून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न सुरू आहे. विठ्ठलसाईने वीस वर्षात ऊस कमी आहे म्हणून कधी कारखाना बंद ठेवला नाही आणि अतिरिक्त ऊस असतानाही सर्व सभासदासह इतर शेतकऱ्यांच्या ऊसाचे गाळप केले. यंदा ऊसाचे क्षेत्र सर्वाधिक आहे, बहुतांश शेतकऱ्यांनी चांगल्या वाणांची लागवड केली आहे. कार्यक्षेत्रातील ऊस गाळपासाठी कारखान्याने नियोजन केले असून ऊस शिल्लक रहाणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. एफ.आर.पी. संदर्भात विचारलेल्या प्रश्नांला उत्तर देताना श्री. पाटील म्हणाले की, विठ्ठलसाईने एफ.आर.पी. एक रक्कमीच दिली आहे, आता केंद्र सरकारच्या काय सूचना येतात हे पहावे लागेल. मात्र शेतकऱ्यांच्या दृष्टीने चांगल्या निर्णयाची अमलबजावणी केली जाईल.

सहकारी कारखानदारीला मिळावे बळ !

शेतकऱ्यांच्या आर्थिक भागभांडवलातुन उभारलेल्या सहकारी साखर कारखान्यावर शेतकऱ्यांचा हक्क असतो. अलीकडच्या काळात सहकारी साखर कारखान्यासमोर अनेक अडचणी आहेत परंतू सभासदांचा विश्वास सार्थ ठरवत शासनाच्या धोरणाही विचार करुन ऊस गाळपाचा हंगाम यशस्वी करावा लागतो आहे. जिह्यात विठ्ठलसाई आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दोन सहकारी कारखाने सुरु आहेत. खासगी कारखान्याला आम्ही नाव ठेवणार नाही परंतु येणारा काळ कारखान्यासाठी कठीण असेल, त्यातुन मार्ग काढण्यासाठी शासनाचे महत्वपूर्ण धोरण, त्यापेक्षाही शेतकऱ्यांचा विश्वास, बळ महत्वाचे आहे, असे श्री. पाटील यांनी सांगितले.

"किल्लारी" कारखाना कर्जमूक्त केली, त्याला आणखीन मदत करू ...

उमरगा, लोहारा, औसा व निलंगा तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेला बंद पडलेला किल्लारी येथील शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर घेऊन यशस्वी गाळप करून ४३ कोटी भरून कारखाना कर्जमूक्त केला. राज्यात असे पहिलेच उदाहरण असेल, सहकार क्षेत्रात मराठवाडाही नाविण्यपूर्ण निर्णय घेण्यात मागे नसल्याचे दाखवून दिले. किल्लारीला मदत करताना विठ्ठलसाईला तोटा सहन करावा लागला परंतु शेतकरी हितासाठी निर्णय घेतला गेला. यापुढेही या कारखान्यासाठी मदत करु असे श्री. पाटील यांनी सांगितले.

loading image
go to top