औरंगाबाद येथून हैदराबादसाठी नवीन विमानसेवा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 28 October 2019

पहिल्याच दिवशी हैदराबादसाठी 140 जणांचा प्रवास 

औरंगाबाद - चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्लीपाठोपाठ नवीन हैदराबाद विमानसेवेला प्रारंभ झाला. स्पाईस जेटने रविवारपासून (ता. 27) हैदराबाद-औरंगाबाद-हैदराबाद या विमानसेवेला प्रारंभ केला. 

चिकलठाणा विमानतळावरून एका पोठोपाठ विमानसेवा सुरू होत असल्याने पर्यटन व उद्योग व्यावसायिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. स्पाईस जेटच्या विमानाने रविवारी हैदराबादहून दुपारी 1.40 वाजता औरंगाबादसाठी उड्डाण घेतले. दुपारी 2.50 वाजता हे विमान औरंगाबादेत दाखल झाले. चिकलठाणा विमानतळावर या पहिल्या विमानाला वॉटर सॅल्युट देण्यात आले. त्यानंतर प्रवाशांचे स्वागत करण्यात आले. पहिल्या दिवशी हैदराबादहून 60 प्रवासी औरंगाबादेत दाखल झाले. त्यानंतर औरंगाबादहून 80 प्रवासी हैदराबादला रवाना झाले.

या विमानसेवेला पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. नव्या विमानसेवेच्या प्रारंभप्रसंगी विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे, स्पाईस जेटचे स्टेशन मॅनेजर आर. एच. मुजावर, सूरज मुंडे, सुरक्षा प्रमुख प्रमोद कांबळे, सय्यद फिरोज यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. दुपारी 3.10 वाजता औरंगाबादहून या विमानाने हैदराबादसाठी उड्डाण घेतले. या
विमानसेवेमुळे अवघ्या एक तास 20 मिनिटांत हैदराबादला किंवा हैदराबादहून औरंगाबादला पोचता येणार आहे. 
 
हवी थेट सेवा

अजिंठा आणि वेरूळ या जगप्रसिद्ध लेण्यांसह या भागात असलेल्या अन्य पर्यटनस्थळांचे अधिक प्रभावीपणे ‘प्रमोशन’ व्हायला हवे. पर्यटनवृद्धीसाठी ज्या विमान कंपन्यांची थेट सेवा अपेक्षित आहे; त्यांच्यासह स्वस्त सेवा देणाऱ्या कंपन्यांशी संवाद साधणे गरजेचे आहे. औरंगाबादवरून थेट विमानसेवा सुरू झाली तर येथील हाॅलेट व्यवसाय आणि  पर्यटन व्यवसाय
वाढीस लागणार आहे. 

विमानतळाचा इतिहास
औरंगाबाद विमानतळास 'चिकलठाणा विमानतळ' असेही म्हणतात. 1990 व्या दशकाच्या सुरवातीला, महाराष्ट्र शासनाने या जुन्या विमानतळाला विकसित करण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे अजिंठा, वेरुळला येणार्‍या पर्यटकांची अधिक सोय होणार होती. पण, अपुर्‍या निधीमुळे व शासनाच्या तसेच राजकारणी लोकांच्या दुर्लक्षामुळे हा प्रकल्प सुरू झाला नाही. सन 1990 च्या शेवटी, सरकारने हा प्रकल्प आंतरराष्ट्रीय सहकारासाठी प्रसिद्ध असलेल्या जपान बँकेकडून करून घेतला गेला. त्याच्यासोबतच त्या परिसराचा विकासही अंतर्भूत होता. या नूतनीकृत विमानतळाचे 3 मार्च 2009 ला उद्‌घाटन झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New Flight From Aurangabad-Hyderabad