उस्मानाबादला होणार नवीन विद्यापीठ, समिती देणार तीन महिन्यात अहवाल

तानाजी जाधवर
Thursday, 20 August 2020

उस्मानाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठाच्या निर्मितीसाठी समितीचे गठन करण्यात आले आहे. माजी कुलगुरु आर.एन.माळी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तीन महिन्यांमध्ये अहवाल देण्याचे आदेश उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिले आहे. गुरुवारी (ता.२०) रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहेत.

उस्मानाबाद :  स्वतंत्र विद्यापीठाच्या निर्मितीसाठी समितीचे गठन करण्यात आले आहे. माजी कुलगुरु आर.एन.माळी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तीन महिन्यांमध्ये अहवाल देण्याचे आदेश उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिले आहे. गुरुवारी (ता.२०) रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहेत. जिल्ह्याच्या स्वतंत्र विद्यापीठाच्या निर्मितीच्या वाटचालीस आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे.

जिल्ह्याला स्वतंत्र विद्यापीठ करावे, अशी मागणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास घाडगे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बुधवारी (ता.१९) केली होती. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची खासदार राजेनिंबाळकर व आमदार घाडगे पाटील यांनी भेट घेतली होती. त्याच्या समवेतच मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेऊन हा विषय मांडला होता. मुख्यमंत्री यांनी तातडीने उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांना बैठक लावण्याच्या सूचना दिल्या.

सततच्या पावसामुळे ऊस आडवे, मूग पाण्यात तर सोयाबीनवर आळीचा प्रादुर्भाव

त्यानुसार श्री.सामंत यांनी दुसऱ्याच दिवशी या विषयावर सबंधित विभागाच्या प्रमुखासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक लावली. या बैठकीला उच्च तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव, जिल्हाधिकारी, उपसचिव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव, उच्च शिक्षण विभागाचे संचालक, विभागीय सहसंचालक यांच्यासह विशेष निमंत्रित म्हणून खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास घाडगे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. ही बैठक व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातुन घेण्यात आली.

बैठकीमध्ये विद्यापीठाच्या निर्मितीसाठी आवश्यक बाबीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी एका समितीचे गठण करण्यात आले आहे. या समितीने त्या भागातील सर्व घटकाची मते जाणून घेऊन त्याचा सविस्तर अहवाल तीन महिन्यात द्यायचा आहे. या समितीने पालक, विद्यार्थी सबंधित सर्वच घटक यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्याची तीव्रता लक्षात येणार असल्याचे बाब यावेळी मांडण्यात आली आहे.

या समितीमध्ये माजी कुलगूरु आर.एन.माळी यांच्या अध्यक्षतेखाली शिवाजी विद्यापीठाचे डी.टी शिर्के, माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, माजी प्राचार्या डॉ.अनार साळुंखे, शिक्षणतज्ज्ञ एम.डी. देशमुख, विद्यापीठाचे सिनेट सदस्य संजय निंबाळकर, उच्च तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ.धनराज माने यांच्यासह औरंगाबाद व उस्मानाबाद दोन्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या समितीचे सदस्य असणार आहेत. उस्मानाबादच्या शैक्षणिक क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाची गरज पूर्ण होण्यासाठी यापुढेही सातत्याने पाठपुरावा करणार असल्याची भूमिका लोकप्रतिनिधीनी व्यक्त केली आहे.

(संपादन - गणेश पिटेकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New University To Be Set Up Osmanabad News