औरंगाबाद  : उदयपूर विमानसेवेचे उड्डाण

अनिल जमधडे
Wednesday, 16 October 2019

पहिल्याच दिवशी प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद 

औरंगाबाद  : चिकलठाणा विमानतळावरून तब्बल 21 वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर बुधवारपासून (ता. सोळा) पुन्हा उदयपूर विमानसेवा सुरू झाली. पहिल्याच दिवशी 238 प्रवाशांनी प्रवास करीत भरभरून प्रतिसाद दिला. 

पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबादेतून 21 वर्षांपूर्वी एअर इंडियाची उदयपूर सेवा सुरू होती. त्यावेळी पर्यटनाचा काळ बहरलेला होता. ही सेवा मात्र बंद पडल्यानंतर पर्यटनाला उतरती कळा लागली होती; मात्र उद्योजक, व्यावसायिक व लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे पुन्हा ही सेवा सुरू झाल आहे. बुधवारी पहिल्याच दिवशी मुंबईहून सकाळी 6.20 वाजता चिकलठाणा विमानतळावर दाखल झालेल्या पहिल्या विमानाचे वॉटर सॅल्युटने स्वागत करण्यात आले. मुंबईहून शंभर प्रवासी औरंगाबादला आले. मुंबईसाठी 89 तर उदयपूरसाठी 45 प्रवासी घेऊन विमानाने पुन्हा उड्डाण केले.

या विमानसेवेच्या प्रारंभ प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे, हॉटेल उद्योजक सुनीत कोठारी, उद्योजक ऋषी बागला, मानसिंग पवार, सीएमआयचे अध्यक्ष गिरीधर संगनेरिया, सीआयएसएफचे डेप्युटी कमांडंट ए. मन्ना, टुरिझम डेव्हलपमेंट फोरमचे अध्यक्ष जसवंत सिंह राजपूत, राजेश चक्रवर्ती, प्रदीप माहेश्वरी, भूषण अवद, एअर इंडियाचे मुंबई येथील सेल्स व्यवस्थापक संतोष नायर, स्टेशन मॅनेजर अरुण गलाटे, सय्यद फिरोज यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी या पहिल्या विमानातील प्रवासी, पायलट व कर्मचाऱ्यांचे स्वागत केले. औरंगाबाद-उदयपूर ही 33 वर्षे सुरू असलेली विमानसेवा 1998 मध्ये बंद पडली होती. 

औरंगाबाद-उदयपूर या विमानसेवेला पहिल्याच दिवशी प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. दिवाळीच्या काळात प्रवासी कमी होतात; मात्र दिवाळीनंतरचे बुकिंग वाढले आहे. त्यामुळे ही विमानसेवा चांगली चालणार हे निश्‍चित आहे. 
- अरुण गल्हाटे, स्टेशन मॅनेजर.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news about airport