Vidhansabha 2019 : मनसेच्या बैठकीला प्रमुख पदाधिकाऱ्यांची दांडी

अतुल पाटील
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

दांडी मारणाऱ्यांना "शो कॉज'
मराठवाड्यातील सगळ्याच जागा लढविण्याचा विचार आहे. औरंगाबादच्या 9 जागा लढविणार असून जिल्ह्यातील 39 जणांच्या मुलाखती घेतल्या. 80 ते 85 पदाधिकारी उपस्थित होते. यात गैरहजर असलेल्या पदाधिकाऱ्यांना "शो कॉज' नोटिस देणार असल्याचे मनसेचे मराठवाडा अध्यक्ष जावेद शेख यांनी "सकाळ'ला सांगितले.

विधानसभा 2019 - औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यातील मनसे जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक मराठवाडा अध्यक्ष जावेद शेख यांनी घेतली. त्यांनी जिल्ह्यातील नऊ मतदारसंघातील 39 इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी जिल्ह्यातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची गैरहजेरी चर्चेचा विषय ठरला.

मनसे पक्ष विधानसभा निवडणुक लढविणार की नाही, अशी चर्चा सुरू असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा होकार मिळवण्यात मनसे नेते यशस्वी झाल्याचे कळते. याचवेळी मोजक्‍याच जागा लढविण्यात याव्यात असा सूर असल्याने त्या मोजक्‍या जागेत आपला भागातील जागा असाव्यात, अशी इच्छा राज्यातील ठिकठिकाणचे पदाधिकारी व्यक्‍त करीत आहेत. औरंगाबादच्या सर्वच जागा लढविण्यात याव्यात, अशी विनंती करण्यात आली. त्यानुसार मुलाखतीही घेतल्या.

जिल्हा संघटक संदीप कुलकर्णी यांनी नुकताच राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी जिल्हाध्यक्षांवर आरोप करीत बाहेर पडल्याने शहर आणि जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये असलेली सुंदोपसुंदी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. याच नाराजीतून "ते' जिल्हाध्यक्ष हटवा अशी मागणी छुप्या पद्धतीने होत आहे. तसेच आजच्या बैठकीतही जिल्हाध्यक्ष, जिल्हा संघटक यांची अनुपस्थिती होती. बैठकीसाठी मुंबईहुन मनसे नेते संदीप देशपांडे आणि अभिजित पानसे येणार होते. मात्र, त्यांचीही अनुपस्थिती पदाधिकाऱ्यात चर्चेचा विषय ठरली.

बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मतदारसंघनिहाय मते मांडली. शहर अध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर, विद्यार्थी सेनेचे कार्यकारी सदस्य जयकुमार जाधव, मनविसे जिल्हाध्यक्ष अमोल खडसे, राजू जावळीकर, महिला जिल्हाध्यक्ष नूतन जैस्वाल, शहर उपाध्यक्ष अनिता लोमटे आदींची उपस्थिती होती.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News About Aurangabad MNS