छोटे हटले, बडे ठाण मांडूनच!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मार्च 2019

बीड बायपास सर्व्हिस रोडसाठी तीन दिवस जोरदार कारवाई करणारे महापालिका अधिकारी व पोलिस प्रशासन चौथ्या दिवशी मात्र थंड पडले. अनेक छोटे
मालमत्ताधारक स्वतःच रस्ता मोकळा करून देत आपले साहित्य काढून घेत असताना मोठ्या मालमत्ता मात्र जशास तशा उभ्या आहेत. त्यामुळे सर्व्हिस रोडचे काम खरेच पूर्ण होईल का? याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. 

औरंगाबाद - बीड बायपास सर्व्हिस रोडसाठी तीन दिवस जोरदार कारवाई करणारे महापालिका अधिकारी व पोलिस प्रशासन चौथ्या दिवशी मात्र थंड पडले. अनेक छोटे
मालमत्ताधारक स्वतःच रस्ता मोकळा करून देत आपले साहित्य काढून घेत असताना मोठ्या मालमत्ता मात्र जशास तशा उभ्या आहेत. त्यामुळे सर्व्हिस रोडचे काम खरेच पूर्ण होईल का? याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. 

मृत्यूचा सापळा बनलेल्या बीड बायपासच्या सर्व्हिस रोडचे काम तातडीने सुरू करावे, या मागणीसाठी नागरिक, महिलांनी सोमवारी (ता. 11) पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, आमदार संजय शिरसाट, महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासमोर संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर भावनिक झालेले पोलिस आयुक्त तत्काळ रस्त्यावर उतरले. दबंगगिरी करत त्यांनी दोन ते तीन किलोमीटर पायी फिरत सर्व्हिस रोडसाठी आवश्‍यक असलेली जागा मोकळी करून द्या; अन्यथा तुम्हाला इथेच गाडून टाकीन, अशी धमकी दिली. आयुक्तांचे हे आक्रमक रूप पाहून  अनेकांनी सोमवारी दुपारनंतर रस्ता मोकळा करून देण्यास सुरवात केली. दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता. 12) कारवाईने वेग घेतला. नेहमी वाहनांच्या पार्किंगमध्ये हरवून जाणारा
देवळाई चौक मोकळा करण्यात आला. बुधवारी (ता. 13) सूर्या लॉन्स या बड्या इमारतीची संरक्षक भिंत पाडण्यात आली तर दुसरीकडे महापालिकेने एमआयटी चौक ते संग्रामनगर उड्डाणपुलापर्यंतच्या सर्व्हिस रस्त्यावर मुरूम टाकून दबाई करण्याचे काम हाती घेतले. त्यामुळे किमान कच्चा रस्ता तरी वाहनधारकांना उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र गुरुवारी एकदम चित्र बदलले. महापालिका अधिकारी व पोलिस प्रशासन ढिले पडल्याचे चित्र होते. देवळाई चौकापासून एमआयटी कॉलेजपर्यंत अनेक छोट्या मालमत्ताधारकांनी स्वतः रस्ता मोकळा केला. मात्र मोठ्या इमारतींवर गुरुवारी कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे खरेच रस्ता होणार का? असा प्रश्‍न अनेकजण करत होते. 
 

अधिकारी गायब, वाहने उभीच 
 
कारवाईच्या पहिल्या व दुसऱ्या दिवशी पोलिसांचा मोठा ताफा तसेच महापालिकेचे जम्बो पथक पाडापाडीच्या कामासाठी तैनात करण्यात आले होते. कारवाईदेखील वेगात झाली. गुरुवारी मात्र पोलिस व महापालिका अधिकाऱ्यांची संख्या नगण्य होती. कर्मचारी थातूरमातूर कारवाई करीत होते. 
 

काम सुरू पण इमारतींचे अडथळे 
सर्व्हिस रोडचे काम रात्रंदिवस सुरू असून, संग्रामनगर उड्डाणपुलापर्यंत मुरूम टाकून दबाई करण्यात आली आहे. मात्र उड्डाणपुलापासून देवळाई चौकापर्यंतच्या रस्त्यावर काही मोठ्या इमारती अद्याप जशास तशा उभ्या आहेत. त्यात हिवाळे लॉन्ससह मोठ्या हॉटेल्सचा समावेश आहे. 

 

 व्यवहार झाले ठप्प 

बीड बायपास सर्व्हिस रोडसाठी पाडापाडी सुरू झाल्यापासून या रोडवरील व्यवहार ठप्प झाले आहेत. अनेक हॉटेल, टपऱ्या स्थलांतरित केल्या जात असल्यामुळे या रस्त्यावर चहामिळणेही अवघड झाल्याचे चित्र गुरुवारी होते. 
 

Web Title: News about Beed Bypass Road Aurangabad