कर्जाचे अमिष दाखवून पावणेचार लाखांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

बजाज फायनान्समधून बोलत असल्याची थाप मारून उच्चशिक्षिताला कर्जाचे आमिष दाखवून चौघांनी पावणेचार लाख रुपये लंपास केले. बतावणी करीत त्यांनी उच्चशिक्षिताला वारंवार पैसे भरण्यास भाग पाडले. ही घटना 7 ते 29 ऑगस्टदरम्यान घडली. 

औरंगाबाद - बजाज फायनान्समधून बोलत असल्याची थाप मारून उच्चशिक्षिताला कर्जाचे आमिष दाखवून चौघांनी पावणेचार लाख रुपये लंपास केले. बतावणी करीत त्यांनी उच्चशिक्षिताला वारंवार पैसे भरण्यास भाग पाडले. ही घटना 7 ते 29 ऑगस्टदरम्यान घडली. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, अमित शिंदे, श्रद्धा, प्रशांत इंगळे व विक्रमसिंग अशी संशयितांची नावे आहेत. या प्रकरणातील दिग्विजय गुलाबराव जगताप (32, रा. तिरुपती सोसायटी, जालाननगर) हे स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत. ते शिक्षणानिमित्त जालाननगरात त्यांच्या नातेवाइकांकडे राहतात. जगताप यांना गावाकडे बांधकामासाठी पैशांची गरज होती. त्यामुळे ते कर्ज मिळविण्याच्या प्रयत्नात होते. सात ऑगस्टला त्यांना अमितसिंग नामक व्यक्तीने फोन केला. बजाज फायनान्स कंपनीतून बोलत असल्याचे सांगत आठ लाखांचे कर्ज मंजूर करून देतो, अशी त्याने थाप मारली. नंतर श्रद्धा, प्रशांत इंगळे व विक्रमसिंग यांनीही संपर्क केला. सुरवातीला कर्जाचा विमा काढावा लागेल. विम्याची रक्कम गहाण ठेवून त्यावर कर्ज मिळेल, अशा त्यांनी थापा मारल्या. तसेच त्यासाठी एक लाख 40 हजार रुपये भरावे लागतील, असेही सांगितले.

त्यामुळे जगताप यांनी सुरवातीला रक्कम भरली. मात्र, भामट्यांनी रक्कम खात्यात जमा झाली नाही, असे म्हणत भरलेली रक्कम पुन्हा तुम्हाला पाठवतो. मात्र, पुन्हा तेवढीच रक्कम भरा, असे सांगत एक लाख 40 हजार रुपये आणखी मागवले. अशा विविध क्‍लृप्त्या वापरून जगताप यांच्याकडून तीन लाख 60 हजार रुपये उकळले. पैसे भरल्यानंतरही कर्ज मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जगताप यांनी गुरुवारी सातारा पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार याप्रकरणी फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तपास उपनिरीक्षक बंडेवाड करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news about Four lakhs of fraud