सावधान! मोबाईलने मुलांचे आरोग्यच नव्हे तर भविष्यही धोक्‍यात

प्रतीकात्मक छायाचित्र.
प्रतीकात्मक छायाचित्र.

औरंगाबाद - 'काय करावं? मोबाईल हातात न दिल्यास किंवा दिलेला ओढून घेतल्यास आमचा मुलगा खूपच रडतो. चिडचिड करतो, रागही खूप येतो. दोनवेळ तर त्याने मोबाईल भिरकावून टीव्हीच फोडला!' हा अनुभव आहे शहरातील एका हतबल पालकाचा. त्याला मोठी बहीणही आहे; पण तिच्याशी तो खेळत नाही, हवा फक्त मोबाईल. ही कहाणी ऐकून कुणीही थक्क होईल, आश्‍चर्यही व्यक्त करेल; पण अशी अनेक उदाहरणे शहरात समोर येत आहेत. मोबाईलमुळे मुलांचे आरोग्यच नव्हे तर भविष्यही धोक्‍यात येत आहे. त्यामुळेच मुलांच्या हाती मोबाईल देताना विचार करावा लागणारच. 

शहरातील एक नोकरदार दांपत्य. त्यांची मुलगी 14 तर मुलगा निशांत (नाव बदलले आहे) जेमतेम अकरा वर्षांचा. आठ दिवसांपूर्वीची गोष्ट. निशांतला घेऊन पालक बालरोगतज्ज्ञांकडे गेले. निशांत ऐकत नाही. तोडफोड, चिडचिड करतो. त्याला प्रचंड राग येत असल्याचे सांगितले. त्या बालरोगतज्ज्ञांनी समुपदेशक संदीप सिसोदे यांच्याकडे नेण्याचा सल्ला दिला. ते तेथे गेल्यानंतर सांगताना मात्र कचरत होते. निशांतला बाहेर जाण्यास सांगितले. तोही मोबाईल दिल्यानंतरच बाहेर गेला. त्याचे पालक सांगत होते, ""दोन अडीच वर्षांपासून अर्थात नवव्या वर्षांपासून आम्ही निशांतला मोबाईल देत होतो. दोन वर्षांपासून यूट्यूबवर तो व्हिडिओ पाहत होता. जेवत नव्हता, रडत होता म्हणून मोबाईल देत होतो. तीन वर्षांपासून त्याला मोठी सवय जडली. मोबाईल हिसकावून घेतला तर दात खातो, चिडचिड करतो. मोबाईल त्याच्याकडून काढून घेणं जिकिरीचेच. दोन वेळा त्याने घरातील टीव्हीही फोडला. मोबाईल काढून घेतला, की रडणे, ओरडणे, हात झटकणे, मोठे डोळे करणे असे प्रकार तो करतो. आम्हाला भीती वाटते, की त्याच्याकडून मोबाईल घेतला तर त्याला कसे नियंत्रणात आणायचे. त्याला मित्रांमध्ये खेळायला आवडत नाही, घराबाहेर जायला आवडत नाही '' हे सांगताना पालकही हतबल झाले होते. 
 
निरीक्षणानंतर जाणवल्या या समस्या 
तज्ज्ञांनी निशांतचे निरीक्षण केल्यानंतर या सर्व प्रकारामुळे त्याची झोप कमी होणे, वजन कमी होणे, इतर व्यक्ती काय बोलतात, त्याकडे त्याचे लक्ष नसणे, शाळेत जाण्याचा कंटाळा, मनासारखे घडले नाही, कुणी ऐकले नाही तर चिडचिड, आक्रमक होणे, अशा समस्या दिसून आल्या. विशेषत: गोळ्या मारण्याचे खेळ, रेसिंग, विमान रेसिंग, मारामारी आक्रमक हिंसा उत्पन्न करणारे खेळ तो जास्त पाहायचा. व्हिडिओतून आक्रमक गेमकडे त्याचे मन वळल्याचेही दिसून आले. 
 
मोबाईलचे हे आहेत गंभीर परिणाम 
जी मुलं एक ते तीन तास रोज मोबाईलवर घालवितात त्यांना एकाग्रता, अध्ययन, भावनिक व्यवस्थापन, सामाजिक व्यवस्थापन, संवाद, अभिव्यक्ती, संकटांवर मात करण्याची शक्ती विकसित न होणे, एकांगी व्यक्तिमत्त्व तयार होणे, स्वमग्नता वाढते. सभोवतालच्या परिस्थितीचा बोध होण्यास, संपर्क करण्यात अडथळे होतात, अशा विविध समस्या भविष्यात या मुलांना येऊ शकतात. 
 
फारच अट्टहास असेल तरच.... 

  • मुलांना मोबाईल दाखविण्याची मुळात: पाच वर्षांपर्यंत गरज नाही. 
  • पर्याय नसेल तर साडेतीन वर्षांनंतर वीस मिनिटांपर्यंत देऊ शकता. 
  • बालगीत, माहितीचे व्हिडिओ दाखवू शकता. 

  
पालकांची ही जबाबदारी 

  • किती वेळ मोबाईल देणार हे मुलांना स्पष्ट सांगा. 
  • -वेळ संपली, की त्यांना सांगा व तोंडाने काहीही न बोलता व काढून घ्या. 
  • ही कृती करताना आईवडिलांत एकवाक्‍यता असावी. 
  • मोबाईलला पर्याय शोधा, त्यामुळे मुलं मोबाईलकडे जाणारच नाहीत. 
  • त्यांना खेळ खेळायला लावा. चित्र काढायला, रंग भरायला लावा. वस्तू तयार करू द्या. 
  • त्यांनी चुकीचे वर्तन केल्यास जाणीव होईल अशीच, वयाला साजेशीच त्यांना शिक्षा हवी. 
  • मोबाईल पर्याय म्हणून मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ खेळा, गप्पा मारा, प्रश्‍न-उत्तरे नकोत. 

वयाच्या साडेतीन वर्षांपर्यंत कोणत्याही परिस्थितीत मोबाईल दाखविणे अजिबात योग्य नाही. साडेतीन वर्षांआतील मुलांचा मेंदू विविध माहितींची साठवणूक करतात. याच वयात समाजिकीकरण होते. पंचज्ञानेंद्रियांचा वापर कसा करावा याच वयात ही बाब विकसित होते. हा वेळ मोबाईल टीव्हीमध्ये गेला तर भविष्यात याचे भयंकर परिणाम समोर येतात.
मोबाईल हाती देताना पालकांनी खूप विचार करण्याची गरज आहे. 
- डॉ. संदीप सिसोदे, समुपदेशक, मानसोपचारतज्ज्ञ. 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com