esakal | बाजार समितीत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
sakal

बोलून बातमी शोधा

कळंब : संचारबंदीच्या कालावधीत विनाकारण फिरणाऱ्यांच्या दुचाकी जप्त करताना पोलिस.

कळंब कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाकडून गर्दी टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

बाजार समितीत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

sakal_logo
By
दिलीप गंभिरे

कळंब (जि. उस्मानाबाद) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे; मात्र येथील कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाकडून गर्दी टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. शेतमाल उतरून घेणारे अडत व्यापारी, तसेच येणाऱ्यांकडून सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्याचे दिसून येत आहे.

शासनाने शेतमाल बाजार समितीमध्ये विकण्यासाठी शेतकऱ्यांसाठी लॉकडाऊनची अट शिथिल करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काही अटी, शर्ती घालण्यात आल्या आहेत. गर्दीमुळे संसर्ग वाढू नये, याची खबरदारी अडत व्यापाऱ्यांनी घ्यायची आहे; मात्र अडत व्यापारी पूर्वीसारखेच शेतमाल दुकानापुढे उतरून घेत असून, कुठलीही शिस्त राखली जात नसल्याची बाब समोर येत आहे.

अडत व्यापाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे, हे बाजार समितीच्या प्रशासन व पदाधिकाऱ्यांचे काम आहे. प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, सक्षम असे जिल्हाधिकारी यांच्याकडून गर्दी टाळण्यासाठी वारंवार आवाहन करण्यात येत आहे. स्थानिक पोलिस प्रशासन, महसूल व आरोग्य प्रशासन हे गर्दी टाळण्यासाठी नागरिकांच्या हितासाठी अहोरात्र झटत आहेत.

वाचा : लातूर जिल्हाधिकाऱ्यांचा एप्रिल फुल, मॉर्निंग वॉक करणारे सहा जण ताब्यात

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अडत व्यापाऱ्यांसह किराणा दुकाने आहेत. किराणा व्यापारी आनंद बलाई यांनी दुकानापुढे ग्राहकांची गर्दी होऊ नये, यासाठी सुयोग्य अंतर ठेवून ग्राहकांना किराणा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे दिसून येते; मात्र उर्वरित छोटे-मोठे किराणा दुकानदार, अडत व्यापारी यांच्याकडून गर्दी टाळण्यासाठी घ्यावयाच्या दक्षतेकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर येत आहे. 

बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर गर्दी 
बाजार समितीच्या प्रवेशद्वारालगत काही गोळ्या-बिस्कीट व किरकोळ विक्रीची किराणा दुकाने आहेत. गोळ्या-बिस्कीट दुकानात तंबाखूजन्य पदार्थ व तंबाखू विक्री जोरात सुरू असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे येथे नागरिकांची गर्दी होत असल्याची बाब उघड होत आहे. 

वाचा पोलिसांनी दिले त्याला डॉक्टरांच्या ताब्यात, कोरोना बाधितांच्या संपर्कात आला होता

दुचाकी जप्तीची कारवाई 
सरकारने ता. २३ मार्चला संचारबंदी लागू केली. दोन दिवस विनाकारण दुचाकीवरून गर्दी करणाऱ्यांना पोलिसांनी लाठीचा प्रसाद दिला. त्यामुळे संचारबंदी सार्थकी लागली. पोलिसांची लाठी थांबल्याने पुन्हा क्षुल्लक कारणासाठी दुचाकीवरून घराबाहेर पडणाऱ्यांची गर्दी वाढली आहे.

घराबाहेर पडू नका, संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांना सहकार्य करा, अशी विनंती करूनही पोलिसांच्या विनंतीला नागरिकांकडून गांभीर्याने घेतले गेले नाही. त्यामुळे रस्त्यांवरून विनाकारण दुचाकीवरून फिरणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी बुधवारी (ता. एक) कारवाईची धडक मोहीम सुरू केली आहे. या कारवाईत दुपारपर्यंत ७० पेक्षा अधिक दुचाकी जप्त करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक तानाजी दराडे यांनी सांगितले.

पोलिसांनी दुचाकीवरून विनाकारण फिरणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारल्याने रस्त्यांवरील गर्दी आटोक्यात आली आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत काही रिकामटेकडे नाहक फिरून गर्दी करीत आहेत. अशांविरुद्ध पोलिसांनी सुरू केलेल्या दुचाकी जप्तीच्या कारवाईबद्दल नागरिकांतून पोलिसांचे कौतुक केले जात आहे. 

loading image