विरोधकांना उमेदवारच मिळेना ः रावसाहेब दानवे

प्रकाश बनकर
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

. भाजप-शिवसेनेसाठी देशात चांगले वातावरण आहे. यामुळे राज्यात 225 जागा निवडून येतील. दीडशे वर्षांची कॉंग्रेस संपत चालली आहे. रोज एक आमदार राजीनामा घेऊन येत आहे. त्यांनाही पारखूनच आम्ही प्रवेश देत आहोत.

औरंगाबाद : "काल राष्ट्रवादीच्या एक बड्या नेत्यासोबत होतो. त्यांच्याशी गप्पा मारताना उमेदवारांची यादी का जाहीर करत नाही असे विचारले असता ते म्हणाले, की आम्ही तुमच्या यादीची वाट पाहत आहोत. तुमच्यातील जे सटकतील ते आमच्याकडे येतील, तेव्हा आम्हाला उमेदवार मिळेल. इतकी पुअर पोझिशन ऍपोझिशन पक्षाची झाली असल्याची टीका केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली. 

औरंगाबादेत प्रचार कार्यालयाच्या उद्‌घाटनप्रसंगी श्री. दानवे बोलत होते. भाजप-शिवसेनेसाठी देशात चांगले वातावरण आहे. यामुळे राज्यात 225 जागा निवडून येतील. दीडशे वर्षांची कॉंग्रेस संपत चालली आहे. रोज एक आमदार राजीनामा घेऊन येत आहे. त्यांनाही पारखूनच आम्ही प्रवेश देत आहोत. त्यांना राजीनामा का देताय विचारल्यानंतर ते म्हणतात, "आमच्या अध्यक्षांनीच राजीनामा दिलेला आहे.' 

पुढचा सुवर्णकाळ आहे. ड्रायपोर्ट, डीएमआयसी, समृद्धी महामार्गामुळे जालना, औरंगाबाद शहर एक होईल. येथे मुंबई, पुणेप्रमाणे मेट्रो चालवावी लागेल. देशभरातून मोदींनी मोठा निधी आणला आहे. यात 35 टक्‍के गुंतवणूक राज्यात केली आहे. त्याकडे आमचे लक्ष आहे. 
अंबादास दानवे आणि सावे यांची जोडी चांगली आहे. जोडी चांगली असेल तर कामे होतात. अंबादास दानवे यांनी आता नेतृत्व हाती घ्यावे. लोकसभेच्या वेळी अतुल सावेंनी चांगले काम केले आहे. आता अंबादास दानवेंनी पुढाकार घेत विधानसभेसाठी काम करावे, असेही रावसाहेब दानवे यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about Opposition can't get candidates: Ravasaheb Danve