भुकेलेल्यांसाठी दिली दोन एकरातील केळी

सयाजी शेळके
सोमवार, 30 मार्च 2020

तुळजापूर तालुक्यातील एका सर्वसामान्य शेतकऱ्याने हा धाडसी निर्णय घेतला आहे. संकटात अडकलेल्या गरीबांना मदतीचा हात देत ‘दानत' काय असते, हे टोलेजंग इमारतीत राहणाऱ्यांना त्यांनी दाखवून दिले आहे.

उस्मानाबाद : संचारबंदीमध्ये अडकलेल्या गोरगरिबांसाठी कामठा (ता. तुळजापूर) येथील एका शेतकऱ्याने दोन एकरातील संपूर्ण केळी घेऊन जाण्याचे आवाहन प्रशासनाला केले आहे. देशावर कोरोनाचे संकट ओढावले असून, अशा सर्वसामान्य शेतकरी म्हणून पैसे देता येत नाहीत; मात्र लॉकडाऊनमध्ये घराकडे परतत असताना वाटेतच अडकलेल्या गरजूंसाठी विकास रामलिंग पटाडे या शेतकऱ्याने शेतात बहरलेल्या बागेतील संपूर्ण केळी दिली आहे. विशेष म्हणजे अल्पशिक्षित असलेले विकास अजूनही पत्र्याच्या घरामध्ये राहतात. मात्र त्यांनी दोन एकर केळीची बाग देऊन दानशूरपणाचे एक उत्तम उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे.

कोरोणा विषाणूच्या संकटाने संपूर्ण जग हादरले आहे. देशात लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजीरोटीचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यासाठी देशभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. टाटा समुहाचे रतन टाटा यांनी राज्याला दिड हजार कोटी रुपयांची मदत दिली आहे. तर अभिनेता अक्षय कुमारने२५ कोटी रुपये देत आपले कर्तव्य पार पाडले आहे. दरम्यान उस्मानाबाद जिल्ह्यातील कामठा येथील शेतकऱ्यानेही या संकटावर मात करण्यासाठी स्वतःची दोन एकरातील केळीची बाग शासनाकडे सुपूर्त 

साधी राहणी; उच्च विचार 
विकास रामलिंग पटाडे यांना दोन मुली, एक मुलगा आहे. मुलाने सावित्रिबाई फुले विद्यापीठातून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे. तर मुलीनेही याच विद्यापीठातून आयटीचे (कॉम्प्युटर) शिक्षण पूर्ण केले आहे. तर तिसरी मुलगी वाणिज्य शाखेत शिकत आहे. दरम्यान विकास यांनी मात्र जेमतेत सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. शिवाय एका छोट्याश्‍या पत्र्याच्या शेडमध्ये राहतात. मुंबई, पुण्यासारख्या महानगरात टोलेजंग इमारतीमध्ये राहून कोट्यवधी रुपयांची माया जमविणारी मंडळी कमी नाही. मात्र स्वतः अल्पशिक्षित असून मुलांना शिकविणे, दानशूपणा काय असतो, ते कृतीमधून दाखवून देण्याचे काम रामलिंग यांच्या ‘साधी राहणी; उच्च विचारातून' दिसून येत आहे. 

हेही वाचा : लातूर जिल्ह्यात दहा नवीन भोजनालय मंजूर, शिवभोजनाची थाळी मात्र पार्सलमधूनच

याला म्हणतात दानत 
आई-वडीलांसह गावात (कामठा, ता. तुळजापूर) राहणाऱ्या विकास यांना केवळ साडेतीन एकर शेती आहे. यापैकी दोन एकर बागायती असल्याने त्यांनी केळीची लागवड केली. त्यासाठी ठिबक सिंचन संच, पाईपलाईन, केळी लागवड, खत व्यवस्थापन यासाठी सुमारे दिड लाख रुपयांचा खर्च केला आहे. सध्या केळी काढण्याच्या अवस्थेत आहे. केळीला चांगले पैसे मिळाले असते. पण, सध्या कोरोणाचे संकट अधिकच गडद होत आहे. पुणे, मुंबई, ठाणे अशा महानगरात अनेक नागरिक, कामगार अडकून बसले आहेत. त्यांच्या हाताला काम नाही. त्यामुळे आपल्या मूळगावी जाण्याच्या प्रयत्नात आहेत. अशा गरजूंची उपासमार होउ नये यासाठी विकास यांनी केळीची बाग देण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे विकास यांचे कुटुंब पत्र्याच्या घरामध्ये राहते. मात्र त्यातही त्यांनी दोन एकर केळी संकटात अडकलेल्या गरीबांना देऊन ‘दानत' काय असते, हे टोलेजंग इमारतीत राहणाऱ्यांना दाखवून दिले आहे. 

मी शेतकरी आहे. माझ्याकडे गरजूंना मदत करण्यासाठी पैसे नाहीत. पण, मला मदत करण्याची इच्छा आहे. देशावर संकट आल्यानंतर प्रत्येकाने धावून यावे लागते. माझ्या परिने जेव्हडी मदत करता येईल, ती करण्याचा मी प्रयत्न केला आहे. दोन दिवसांत बागेतून केळी घेऊन जाण्याचे आवाहन प्रशासनाला केले आहे. 
- विकास रामलिंग पटाडे, कामठा, ता. तुळजापूर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about Osmanabad