जालन्याच्या तरुणाने बनविले पॉकेट साईज टॉयलेट, युरोपमध्येही मागणी

आदित्य वाघमारे
Monday, 19 August 2019

प्रवासी, रुग्ण यांची गैरसोय टळणार

औरंगाबाद - वृद्ध, मूत्रविकाराने त्रस्त असणाऱ्या रुग्णांना दिलासा देण्याचे काम एका पंचविशीतील तरुणाने केले आहे. लघुशंकेला पाच सेकंदांत गोठवणाऱ्या 'पॉकेट साईज' टॉयलेट अर्थात "पी बॅग'ची निर्मिती जालन्याच्या सिद्धांत टावरवाला या तरुणाने केली आहे. पुरुषांसह महिलांसाठीही उपयोगी या पी बॅगच्या जोरावर या तरुणाने भारतासह युरोपियन राष्ट्रांमध्ये अवघ्या सात महिन्यांत लाखोंची उलाढाल करून दाखवली आहे. 

अनेक वृद्धांना आपल्या जागेहून स्वच्छतागृहात जाण्यासाठी वेळ लागत असल्याने त्यांची कुचंबणा होते. दुसरीकडे प्रवासात, घराबाहेर असलेल्यांना सार्वजनिक स्वच्छतागृहे ही दुर्गंधी
आणि घाणीमुळे सुविधेऐवजी आरोग्यास अपायकारक ठरतात. मग उघड्यावर लघुशंका करणे अपरिहार्यच; मात्र यातून होणारी दुर्गंधी आणि संभाव्य संसर्ग टाळण्याचे काम करणारी पी
बॅग सिद्धार्थने तयार केली आहे. पी बॅगमध्ये लघवी केल्यास त्याच्या संपर्कात येणाऱ्या रसायनांमुळे अवघ्या पाच सेकंदांत ही लघवी घट्ट होते. विशेष म्हणजे यातून लघवी सांडणे
सोडाच, त्याची दुर्गंधीही येत नसल्याची माहिती सिद्धार्थने दिली. त्यामुळे अस्वच्छ स्वच्छतागृह वापरण्याची गरजच नाहीच; पण वृद्धांना कॅथेडरसारख्या संक्रमण वाढवणाऱ्या यंत्रणेतून
सुटका करण्यासाठी यातून मदतच होणार असल्याचे तो म्हणाला. 
 
सात महिन्यांत लाखोंची उलाढाल 
सिद्धांतने हे उत्पादन बनवण्यापूर्वी अडीच वर्षे संशोधन केले. केंद्र सरकारतर्फे उत्पादनाच्या चाचण्यांवर मंजुरीची मोहोर उठवण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे उत्पादन घेण्यासाठी त्याने जालन्यात कारखाना सुरू केला. ही बॅग निसर्गपूरक असून, तीन महिन्यांत या बॅगचे आणि त्यातील लघवीचे अस्तित्व नाहीसे होते, असा दावा सिद्धांतने केला. सात महिन्यांत लाखोंची उलाढाल करण्यात सिद्धांत यशस्वी झाला असून, त्यातून 15 जणांसाठी रोजगाराच्या वाटाही खुल्या झाल्या आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news about Pocket size toilet