esakal | माना टाकलेली पिके तरारली
sakal

बोलून बातमी शोधा

उमरगा ः तालुक्‍याच्या अनेक भागांत शुक्रवारी रात्री झालेल्या पावसामुळे बहरलेली खरीप पिके.

सलग पावसामुळे जीवदान, नारंगवाडी मंडळात अतिवृष्टी 

माना टाकलेली पिके तरारली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद ः जिल्ह्याच्या काही भागांत पावसाने सलग दोन दिवस हजेरी लावल्याने माना टाकलेली खरीप पिके बहरली आहेत. शुक्रवारी (ता.30) व शनिवारी (ता. 31) उमरगा व लोहारा तालुक्‍यांत दमदार पाऊस झाला. नारंगवाडी महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली; तर जिल्ह्यातील 42 पैकी 11 महसूल मंडळांत चांगला पाऊस झाला आहे. 


जिल्ह्यात यंदा अडीच महिने होऊन गेले तरी दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली नाही. अधूनमधून होणाऱ्या रिमझिम पावसामुळे झालेली पेरणी आणि त्यानंतरही असाच पाऊस झाल्याने काही ठिकाणी खरीप पिकांनी तग धरला; मात्र अनेक दिवस पावसाने ओढ दिल्याने पिके सुकून गेली आहेत. शुक्रवारी रात्रीपासून जिल्ह्याच्या काही भागांत पावसाने हजेरी लावली. उमरगा व लोहारा तालुक्‍यांत दमदार पाऊस झाला. लोहारा तालुक्‍यात शनिवारी सकाळी आठपर्यंत गेल्या 24 तासांत सरासरी 54 मिलिमीटर, तर उमरगा तालुक्‍यात 32 मिलिमीटर पाऊस नोंदला गेला. उमरगा तालुक्‍यातील नारंगवाडी महसूल मंडळात सर्वाधिक 77 मिलिमीटर पाऊस नोंदला गेला. वाशी, परंडा, भूम, कळंब तालुक्‍यांत पावसाने मात्र हुलकावणी दिली.

जिल्ह्यातील 42 महसूल मंडळांपैकी 11 महसूल मंडळांत पाऊस नोंदला गेला. त्यात उस्मानाबाद तालुक्‍यातील केशेगाव मंडळात 23, तुळजापूर मंडळात 28, मंगरूळ मंडळात 30, सलगरा (दिवटी) मंडळात 28, उमरगा मंडळात 28, नारंगवाडी मंडळात 77, मुळज मंडळात 20, दाळिंब मंडळात 33, लोहारा मंडळात 53, माकणी मंडळात 62, जेवळी मंडळात 47 मिलिमीटर पाऊस नोंदला गेला. या 11 मंडळांत झालेल्या दमदार पावसामुळे त्या मंडळांतील खरीप पिकांना काही दिवसांसाठी का होईना जीवदान मिळाले आहे. सध्या सोयाबीनचे पीक काही ठिकाणी फुल व फळधारणेच्या अवस्थेत आहे. त्यामुळे या पिकाला मोठा आधार मिळाला आहे. जिल्ह्याच्या उर्वरित 31 महसूल मंडळांत मात्र पाऊस झाला नाही. 
उस्मानाबाद शहर व परिसरात शुक्रवारी रात्री आणि शनिवारी दुपारनंतर रिमझिम पाऊस झाला. उस्मानाबाद शहरात सायंकाळी उशिरापर्यंत रिमझिम पाऊस सुरू होता. पाथरूड (ता. भूम) परिसरातही शनिवारी सायंकाळी तासभर दमदार पाऊस झाला. 
शनिवारी सकाळी आठपर्यंत संपलेल्या 24 तासांत नोंदला गेलेला पाऊस, कंसात आतापर्यंत नोंदलेला पाऊस याप्रमाणे ः उस्मानाबाद ः 5.75 (282.37), तुळजापूर ः 17.57 (382.31), उमरगा ः 32.00 (382.80), लोहारा ः 54.00 (427.35), कळंब ः 1.33 (216.66), भूम ः 0.20 (241.50), वाशी ः 0.00 (253.06), परंडा ः 0.00 मिलिमीटर (141.00 मिलिमीटर). जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 37.90 टक्के पाऊस नोंदला गेला आहे. पाणीसाठ्यात व भूगर्भातील पाणीपातळीत वाढ होण्यासाठी जिल्ह्यात आणखी मोठ्या पावसाची गरज आहे. 

loading image
go to top