esakal | सलीम अली सरोवरात सहा कोटींचा चुराडा
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबाद ः सलीम अली सरोवरातील जॉगिंग ट्रॅकची दुरवस्था झाली आहे. जॉगिंग ट्रॅकलगत अनेकांनी अतिक्रमणे सुरू केली आहेत.

ऐतिहासिक सलीम अली सरोवराचे जतन करण्यात महापालिका प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. सुमारे सहा कोटी रुपये खर्च करून काही वर्षांपूर्वी सरोवराचे सुशोभीकरण करण्यात आले; मात्र गेट, पाथवे, पक्षी निरीक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या टॉवरची सध्या पडझड सुरू झाली आहे. तसेच सरोवराच्या चारही बाजूंनी अतिक्रमणांचा विळखा दिवसेंदिवस वाढत असून, अनेकांनी सरोवरात भराव टाकून लॉन तयार केले आहेत. 

सलीम अली सरोवरात सहा कोटींचा चुराडा

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद - ऐतिहासिक सलीम अली सरोवराचे जतन करण्यात महापालिका प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. सुमारे सहा कोटी रुपये खर्च करून काही वर्षांपूर्वी सरोवराचे सुशोभीकरण करण्यात आले; मात्र गेट, पाथवे, पक्षी निरीक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या टॉवरची सध्या पडझड सुरू झाली आहे. तसेच सरोवराच्या चारही बाजूंनी अतिक्रमणांचा विळखा दिवसेंदिवस वाढत असून, अनेकांनी सरोवरात भराव टाकून लॉन तयार केले आहेत. 

ऐतिहासिक सलीम अली सरोवरात देश-विदेशांतील पक्षी येतात. तसेच मोठी झाडी असल्यामुळे अनेक प्रकारची जैवविविधता आहे. त्याचे जतन करण्याची जबाबदारी महापालिकेची असताना, त्यावर घाला घालण्याचे काम सुरू आहे. सरोवरात येणाऱ्या ड्रेनेजच्या पाण्याचा विषय अनेक वर्षे गाजला. त्यानंतर महापालिकेने या ठिकाणी एसटीपी प्लॅंट सुरू केला. असे असले तरी पावसाळ्यात नाल्याचे पाणी थेट सरोवरात घुसते. त्यामुळे पाण्याची दुर्गंधी कायम आहे. दरम्यान, शासन व महापालिकेच्या निधीतून सुमारे सहा कोटी रुपये खर्च करून सलीम अली सरोवराचे सुशोभीकरण करण्यात आले. मात्र, सुशोभित सरोवर परिसरात फक्त महिनाभर नागरिकांना फेरफटका मारता आला. या ठिकाणी सुरू करण्यात येणाऱ्या बोटिंगला पक्षीमित्रांनी आक्षेप घेत न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अद्याप हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, तर दुसरीकडे बंद पडलेल्या सरोवराची वाताहत सुरू आहे. या ठिकाणी महापालिकेने 14 सुरक्षारक्षक नेमले असले तरी ते कागदोपत्रीच आहेत. त्यामुळे अनेक टवाळखोर, मद्यपी थेट सरोवर परिसरात जाऊन मासेमारी, साहित्याची नासधूस करीत आहेत. याबाबत "सकाळ'ने प्रसिद्ध केलेल्या छायाचित्राची मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद येथील खंडपीठाने दखल घेत विधिज्ञांची समिती नियुक्त केली आहे. या समितीने केलेल्या पाहणीत अनेक गंभीर प्रकार समोर आले असून, महापालिका सरोवराबाबत गंभीर नसल्याचे समोर आले आहे. 
 

चारही बाजूंनी अतिक्रमणांचा विळखा 
सरोवरात भराव टाकून अतिक्रमण करण्याचा परिसरातील नागरिकांचा सपाटा सुरूच आहे. अनेकांनी सरोवरात चौपाट्या तयार केल्या आहेत. महापालिकेतर्फे वारंवार अतिक्रमणे काढली जातात. मात्र, काही दिवसांतच पुन्हा अतिक्रमणांचा विळखा पडतो. त्यामुळे पक्षीमित्र, पर्यावरणप्रेमींमधून संताप व्यक्त केला जात आहे. 
------------------------------------------ 

loading image
go to top