Video : वर्तमानपत्र वाचनाच्या भूकेकडून समाधानाकडे 

प्रमोद चौधरी
गुरुवार, 9 एप्रिल 2020

प्रत्यक्ष दैनिकाच्या वाचनात बॅटरी डाऊन होण्याचं भय नसते. लाॅकडाऊनच्या काळात दैनिकाचे हे असे हार्डकाॅपीयुक्त वाचन माहिती देते. ज्ञान देते. रंजन करते आणि तुमची वाचनसवय अबाधितही ठेवते.

नांदेड : वर्तमानपत्राचं वाचन हा केवळ विरंगुळा नसतो. जगाच्या माहितीशी तुम्ही समांतर राहाता, यासंबंधीचाही तो एक मुख्य धागा असतो. अत्याधुनिक माध्यमांचे आज प्राबल्य पुष्कळ वाढलेले असले तरी हातात आणि डोळ्यांपुढे वर्तमानपत्र घेऊन ते वाचत, चहाचा आस्वाद घेत पेपर वाचन हे आनंदी होते हा जगाचा नियम आहे.

घराच्या दारांत वर्तमानपत्र पडलं नाही तर आपले काही हरवले आहे काय? आपण काही विसरलो आहोत काय? अशी एक रिकामेपणाची जाणीव अधिक होत राहाते. कारण, सकाळी झोपेमधून जागे झाल्याबरोबर तुमच्या मनानं वाचन करण्याची गोष्ट सवयींमध्ये रुपांतरीत केलेली असते. वर्तमानपत्र वाचनासंबंधीची आनंदस्थळे ही अशाप्रकारची असतात.

वर्तमानपत्राची सर येतच नाही
संगणकाची खिडकी उघडूनही जग पाहाता येते. हल्लीचे अद्ययावत मोबाईल्स एका टचमध्ये तुम्हाला रंगीबेरंगी दुयियादारी दाखवतात. अशी एक नाही तर असंख्य इलेक्ट्राॅनिक माध्यमं तुमच्या दिमतीला आहेत. तरीही वर्तमानपत्र वाचण्याची सर त्यांना येत नाही. छापून बाहेर आलेलं, देखण्या मुखपृष्ठांनं सज्ज झालेलं पुस्तक नुसतं हातांत घेतलं तरी आनंदाच्या धारा मनांत बरसतात. दैनिक हातात घेण्याचा आनंदपण असाच. दैनिकाचा आकार, निवडलेले फाॅण्ट, ले-आऊट, प्रधान बातम्यांना दिलेले स्थान, अग्रलेख, संपादकीय पानांवरील वैचारिक-सामाजिक-शैक्षणिक-सांस्कृतिक-राजकीय-आर्थिक अशा असंख्य अंगांनी बहरलेला मजकूर, त्या त्या जागी समुचित वापरलेले फोटो आणि डोळ्यांना आल्हाद प्राप्त करून देणारी एकूण छपाई या सर्व गोष्टी इलेक्ट्राॅनिकने दिलेल्या सुविधांमधून मिळत नाही. 

वर्तमानपत्र वाचनाची सवय अबाधित ठेवते
त्यासाठी पुढ्यात साक्षात दैनिकच असावे लागते जे बारा-पंधरा पानांनी संपन्न झालेले असते. शिवाय, वर्तमानपत्र समूहधारणा जपते. घरांत ते सर्वांना हाताळता येते, वाचता येते. हवी ती पानं कुटुंबात एकमेकांना देताघेता येतात. लेख, अग्रलेख, छायाचित्रे, कार्टुन्स, विशेष बातमी यांची कात्रणे काळानुकाळ जतन करून ठेवता येतात. 
- प्रा. डाॅ. केशव देशमुख, नांदेड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Newspaper Reading to the Solution Nanded News

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: