पीक नुकसानभरपाईपोटी पहिल्या टप्प्यात नऊ कोटी मदत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

  • पहिल्या टप्प्यात जिल्ह्यासाठी 114 कोटी रुपयांचा निधी
  • प्रशासनाने वरिष्ठांकडे पाठविला हाेता 514 कोटींचा प्रस्ताव
  • रतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानभरपाईपोटी मदत
  • पाटाेदा तालुक्यासाठी नऊ कोटी 35 लाखांचा निधी

पाटोदा (बीड) - परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानभरपाईपोटी बीड जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यात जिल्ह्यासाठी 114 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून त्यापैकी नऊ कोटी 35 लाख रुपये पाटोदा तालुक्‍यासाठी देण्यात आल्याची माहिती तहसीलदार रमेश मुंडलोड यांनी दिली.

तील पाटोदा तालुक्‍यातील शेतकऱ्यांना देण्यासाठी पहिल्या टप्प्याचे अनुदान नऊ कोटी 35 लाख रुपये पाटोदा तहसील प्रशासनास प्राप्त झाले आहे. तालुक्‍यातील 107 गावांतील 49 हजार 116 हेक्‍टर क्षेत्रातील नुकसानीचा अहवाल तहसील प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे पाठविला होता. संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटपासाठी जिल्हा प्रशासनाने 514 कोटींचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला होता.

हेही वाचा - शेकडो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली

यावर्षी खरीप हंगामाच्या सुरवातीला पावसाने ओढ दिल्याने पिकांची उत्पादकता घटली. पोळा सणानंतर झालेल्या पावसाने काही प्रमाणात पीक शेतकऱ्यांच्या हाती लागण्याच्या आशा निर्माण झाल्या होत्या; परंतु ऐन पीक काढणीच्या वेळेस 15 दिवस सतत पावसाने धुमाकूळ घातल्याने हाती आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला.

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्यानंतर नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यात आले. 107 गावांतील 57 हजार 162 शेतकऱ्यांचे 49 हजार 116 हेक्‍टरमधील पिकांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात समोर आले.

तहसील प्रशासनाने मे 2015 च्या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना हेक्‍टरी सहा हजार आठशे रुपये नुकसानभरपाई देण्यासाठी 33 कोटी 39 लाख 88 हजार 800 रुपयांच्या निधीची आवश्‍यकता असल्याचा अहवाल प्रशासनाला पाठविला होता; मात्र शासनाने प्रतिहेक्‍टरी आठ हजार रुपयांप्रमाणे मदत देण्याचा निर्णय केला. त्यानुसार बाधित शेतकऱ्यांना प्रतिहेक्‍टर आठ हजार रुपये त्यांच्या बॅंक खात्यावर जमा करण्यात येणार असून, बाधित शेतकऱ्यांची आकडेवारी पाहता मंजूर झालेला निधी हा काही शेतकऱ्यांना वाटप करण्यात येईल. उर्वरित शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात मिळणाऱ्याचे निधीचे वाटप होईल, असे तहसील प्रशासनाकडून सांगण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nine crores help in the first phase of crop damage