अंगणवाडीच्या कामात नऊ लाखाचा अपहार 

प्रल्हाद कांबळे
रविवार, 29 सप्टेंबर 2019

- अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल
 

नांदेड : पळसा (ता. हदगाव) येथील अंगणवाडी बांधकामासाठी विविध विकास योजनेंतर्गत आलेला नऊ लाखाचा निधी परस्पर हडप करणाऱ्या गटविकास अधिकारी, अभियंता, ग्रामसेवक आणि सरपंचाविरूध्द अपहाराचा मनाठा पोलिस ठाण्यात शनिवारी (ता. 28) रात्री सात वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हादगाव तालुक्यातील पळसा ग्रामपंचायतला अंगणवाडी बांधकामासाठी 13 व्या वित्त आयोगानुसार सन 2013-14 या वित्तीय वर्षात साडेचार लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आणि तो ग्रामपंचायत खात्यात वर्ग झाला. त्यानंतर पुन्हा सन 2014-15मध्ये मागासक्षेत्र विकासाच्या योजनेनुसार साडेचार लाख रुपयाचा निधी अंगणवाडी बांंधकाम करण्यासाठी जमा झाला. परंतु, तत्कालीन ग्रामसेवक, सरपंच व अन्य अधिकाऱ्यांनी संगनमत करून आपल्या पदाचा गैरवापर करत अंगणवाडीचे बांधकाम अर्धवट व निकृष्ट दर्जाचे केले. त्यानंतर बनावट कागदपत्रे तयार करून अंगणवाडी बांधकाम पूर्ण झाल्याचे दाखविले. व शासकिय रक्कम हडप केली. मात्र या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी या गावचे दिपक नारायण पाटील यांनी लावून धरली.

पंचायत समिती, जिल्हा परिषद येथे संबंधीत विभाग प्रमुखांना पत्रव्यवहार केला. परंतु यंत्रणाच भ्रष्ट असल्याने त्यांना पाहिजे अशी मदत मिळाली नाही. पोलिस विभागाने त्यांना साथ दिली नाही. शेवटी दिपक पाटील यांनी हदगाव न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने या प्रकरणी तत्कालीन गटविकास अधिकारी सुभाष नारायण धनवे, ग्रामसेवक पांडूरंग श्रीरामवार, माजी सरपंच कांता विजय मुळे, बांधकाम विभागाचे अभियंता प्रशांत कुलकर्णी आणि परमेश्वर संभाजी मुंडे यांच्याविरूध्द शासकिय रक्कमेचा अपहार करून शासनाची फसवणुक केली म्हणून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. यावरून मनाठा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र मुंडे करित आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nine lakhs Corruption in Childrens school in nanded district