एकोणिस गावांत कोरोनाचा झाला नाही प्रवेश ! एकावन्न लोकांचा मृत्यू

अविनाश काळे
Thursday, 1 October 2020

उमरगा तालुक्यात कोरोनाच्या संसर्गाची व्यापकता वाढली आहे.

उमरगा (जि.उस्मानाबाद) : तालुक्यात कोरोनाच्या संसर्गाची व्यापकता वाढली आहे. ग्रामीण भागातील ७६ गावांत कोरोनाने पाय पसरले आहेत. काही गावांत मोजक्याच व्यक्तींना संसर्ग झाल्याने कोरोनामुक्तीसाठी प्रयत्न झाले तर काही गावांत संसर्ग वाढतच आहे. दरम्यान मोठी लोकसंख्या असलेल्या उमरगा व मुरुम शहरासह तुरोरी, गुंजोटी, नारंगवाडी, नाईचाकूर, येणेगुर, दाळींब या गावांत रूग्ण संख्या आढळून आली आहे. मात्र १९ गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगल्याने कोरोना संसर्गाचा प्रवेश होऊ दिला नाही.

उस्मानाबादेत बेकायदेशीर अँटिजेन टेस्ट करणाऱ्या डायग्नोस्टिक केंद्रावर कारवाई

शहर व तालुक्यात कोरोना संसर्गाची साखळी काही केल्या कमी होत नसल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या तीन महिन्यांत तर संसर्ग झपाट्याने वाढला. तालुक्यात बुधवारपर्यंत (ता.३०) एक हजार ८४१ रूग्णसंख्या होती. त्यात शहरातील संख्या ८४४, तर ग्रामीणची संख्या ९९७ झाली आहे. आतापर्यंत ५१ जणांचा मृत्यु झाल्याची माहिती आहे. उमरगा शहरातील संख्या झपाट्याने वाढत जात होती. त्यानंतर ग्रामीण भागात संसर्ग वाढत गेला आणि तो एक हजाराचा आकडा गाठला आहे.

मुरूम, बलसूर, कोथळी, केसरजळगा, बेडगा, कुन्हाळी, जवळगाबेट, गुंजोटी, गुगळगांव, तुरोरी, एकोंडी (जहागीर), नागराळ (गुंजोटी), चिंचोली (जहागीर), कसगी, माडज, दाळींब, तलमोड, मुळज, कवठा, औराद, कंटेकुर, जकेकुर, दाबका, व्हंताळ, कोरेगाव, सुंदरवाडी, दुधनाळ, नाईचाकुर, पेठसांगवी, तुगांव, बलसूरतांडा, कोरेगांववाडी, जगदाळवाडी, सुपतगांव यासह ७६ गावांत कोरोनाचा संसर्ग झाला. काही गावांनी कोरोनामूक्तीसाठी सचोटीने प्रयत्नही केले आहेत. उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार संजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराधा उदमले, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक डॉ. अशोक बडे, गटविकास अधिकारी कुलदीप कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास साळूंके यांच्यासह पोलिस पाटील, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आदींनी कोरोनामूक्तीच्या जनजागृतीसाठी केलेले प्रयत्न कांही प्रमाणात उपयुक्त ठरले.

साहेब, आमच्या सोयाबीनचे पंचनामे करा हो! एकवीस गावांतील शेतकऱ्यांचा टाहो

१९ गावांनी बाळगली सतर्कता
गेल्या सहा महिन्यांपासून कमी-अधिक प्रमाणात कोरोनाचा संसर्ग सुरूच आहे. ग्रामीण भागात राज्यातील विविध भागातून आलेल्या लोकांना क्वारंटाइन करण्याचे योग्य नियोजन केले त्यात बऱ्याच गावांना कोरोनाला दूर ठेवण्यात यश मिळाले होते मात्र पुन्हा संसर्ग वाढल्याने ७६ गावांत व्यापकता वाढली. मात्र एकोंडीवाडी, मानेगोपाळ, हंद्राळ, गुंजोटीवाडी, आष्टा (जहागीर), थोरलीवाडी, धाकटीवाडी, हिप्परगाराव, मळगीवाडी, अंबरनगर, फुलसिंग नगर, इंगोले तांडा, गणेशनगर, वरनाळवाडी, रामपूर, जकेकूरवाडी, बोरी, आचार्य तांडा येथील ग्रामस्थांनी बाळगलेल्या सतर्कतेमुळे कोरोना गावात आला नाही.

 

कोरोना संसर्ग गावापासून दूर रहाण्यासाठी योग्य वेळी विलगीकरण, लोकांमध्ये सावधगिरीविषयी जनजागृती केली. निर्जुंकीकरणाला वेळोवेळी प्राधान्य दिले. ग्रामस्थांच्या सामुहिक प्रयत्नातून कोरोनाचा संसर्ग गावात पोहचला नाही. मोठ्या पावसाने सोयाबिन पाण्यात गेले आहे त्याची चिंता शेतकऱ्यांना आहे. कोरोनाचा विषय बाजूला ठेवत शेतीतील कामात अनेक जण व्यस्त आहेत.
- बालक मदने, पोलिस पाटील, बोरी

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No Entry In 19 Villages, Fifty One People Died