औरंगाबादेत कोरोना रुग्णांसाठी आयसीयू बेड शोधत फिरण्याची वेळ; रुग्णवाहिका, नातेवाईक रस्त्यावरच

4Beds_0
4Beds_0

औरंगाबाद : वेळ गुरुवारी (ता. तीन) रात्री साडेआठची.अचानक दम लागत असल्याने एका सत्तरवर्षीय महिला रुग्णाला खासगी रुग्णालयात नेले; रुग्ण गंभीर होता; पण तिथे बेड नसल्याने पुन्हा दुसऱ्या नंतर तिसऱ्या रुग्णालयात नेले; पण हीच स्थिती सर्वत्र. पाच रुग्णालय फिरल्यानंतर मध्यरात्री दीड वाजेनंतर कसाबसा बेड मिळाला! त्यानंतर रुग्णांसह नातेवाइकांचा जीव भांड्यात पडला.

रुग्णाला तब्बल पाच तास जीव मुठीत धरून ताटकाळावे लागले. कोरोनाची लागण झालेल्या गंभीर रुग्णांना आयसीयू बेड मिळत नसल्याची गंभीर बाब समोर आली. अशीच स्थिती असंख्य गंभीर रुग्णांची झाली असून रुग्णालयाचे उंबरठे झिजवत रुग्णवाहिका रुग्णांना घेऊन आयसीयू बेडसाठी फिरत असल्याची धक्कादायक बाबही दिसून आली आहे.

रुग्णवाहिकेतच करावी लागतेय वेटिंग
- शहरातील मोजक्याच खासगी रुग्णालयांना कोविड उपचाराची परवानगी; मात्र रुग्णांसाठी आयसीयू बेड शिल्लक नाही.
- आयसीयू बेडच्या कमतरतेमुळे गंभीर कोरोना रुग्णांना बेडअभावी रुग्णवाहिकेतून रस्त्यावर फिरविण्याची वेळ आली आहे.
- घाटी रुग्णालयातही कोरोना रुग्णांना तासन् तास कॅज्युअल्टीसमोर रुग्णवाहिकेत थांबावे लागत आहे.
- इतर ठिकाणांहून घाटीत भरतीसाठी आणलेल्या रुग्णांवर उपचारासाठी गर्दी आणि प्रक्रियेमुळे लागतोय विलंब.

मुसळधार पावसाने औरंगाबाद शहरात दाणादाण, अनेक वस्त्यांमध्ये शिरले पाणी

लवकरच नियंत्रण कक्ष
बेड मिळतच नाही असे असूच शकत नाही. विशिष्ट हॉस्पिटल्समध्येच बेड हवा असेल तर मिळेलच असे नाही. जिल्हा रुग्णालयात बेड उपलब्ध आहेत; पण काही लोक म्हणतात आम्ही तेथे जाणार नाही. प्रत्येक जणांना इच्छेनुसार हव्या त्या रुग्णालयात बेड मिळू शकेल असे नाही. लोकांना एवढेच सांगायचे आहे, की सर्व ठिकाणी एक्स्पर्ट डॉक्टर्स आहेत. सगळीकडे आपण व्यवस्था चांगल्या तयार केल्या आहेत. ट्रीटमेंटचा प्रोटोकॉल सर्वत्र सारखा आहे. आपण युद्ध लढतोय जिथे बेड उपलब्ध असेल तिथे आपण जायला हवे. जिल्हा रुग्णालयात मनुष्यबळ वाढवीत आहोत. खासगी रुग्णालयात कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी आयसीयू बेड वाढविण्याची सूचना केली आहे. आपल्या कार्यामुळेच डेथरेट कमी झाला आहे. रिकव्हरी रेटही ७८ टक्क्यांपर्यंत गेला हे आपले यश आहे. चोवीस तास कार्यरत असेल अशी कंट्रोल रूम उभारत आहोत. त्याद्वारे लोकांच्या समस्या निवारणासाठी कार्य करणार आहोत.

 - सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी


मराठवाडा हॉस्पिटल असोसिएशनने सुचवला तोडगा
मराठवाडा हॉस्पिटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. हिमांशू गुप्ता यांनी सांगितलेले कारण आणि उपाय
कारण : घाटी रुग्णालय मराठवाड्यासाठी आहे. येथे सर्वच ठिकाणाहून मोठ्या संख्येने रुग्ण येतात. औरंगाबादेत कोरोना मोहीम सुरू होऊन पाच महिने झाले. म्हणजेच सर्व रुग्णालयाचे लोक आता एक्स्पर्ट झाले आहेत. म्हणून बाहेरून शहरात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचा ओढा वाढला आहे. त्यामुळे बेडसंख्या कमी पडत आहे. जे बेड आहेत ते पंधरा लाखांच्या लोकसंख्येवर होते, रुग्णांचा ओघ पाहता ते पन्नास लाखांवर गेले. अर्थातच रुग्णसंख्या, बेडचा रेशो (अनुपात) डिस्टर्ब झाला. त्यामुळे ही स्थिती आहे.
यावर तोडगा : शहरात बाहेरून येणारे बरेच रुग्ण आहेत. बाहेर जी रुग्णालय आहेत, त्या सर्व ठिकाणी इंटेन्सिव्ही केअर फॅसिलिटीचे बेड उपलब्ध असतात; पण त्या ठिकाणी प्रोटोकॉल बेस ट्रीटमेंट द्यायला हवी. ती व्यवस्थित आहे की नाही हे लक्षात घेऊन औरंगाबादेत कुशल इंटेन्सिव्हिस्ट आहेत, त्यांचाशी संवाद करून ही समस्या व्यवस्थित होऊ शकते. मराठवाड्यातील प्रत्येक रुग्णालयात पाच ते सहा इंटेन्सिव्ह केअर युनिट आहेत; पण त्यांना कोविडची प्रोटोकॉल बेस ट्रीटमेंट मॉर्डेनिटीबाबत आत्मविश्‍वास दिला तर ही स्थिती नियंत्रणात येऊ शकते.


(संपादन - गणेश पिटेकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com