लिंबेजळगाव परिसरात मजूर मिळेना, निवडणूक सभांमुळे गाव रिकामे

लिंबेजळगाव (ता.गंगापूर) ः परिसरात मजुरांअभावी मिरचीची तोडणी झालेली नाही.
लिंबेजळगाव (ता.गंगापूर) ः परिसरात मजुरांअभावी मिरचीची तोडणी झालेली नाही.

लिंबेजळगाव (जि.औरंगाबाद)  : लिंबेजळगाव, तुर्काबाद खराडीसह (ता.गंगापूर) परिसरात आठवडाभरापासून महिलांसह पुरुष मजूर मिळेनासे झाले आहेत. सध्या खरीप हंगामातील मिरची पीक सर्वत्र चांगले आले असून, तोडणीचे काम सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी जूनच्या दरम्यान ठिबक व पुरेसे पाणी असलेल्या शेतात कापसाची लागवड केल्यानंतर दसरा सणापासून अनेक शेतकऱ्यांनी कापूस वेचणीस सुरवात केली आहे.

महिला मजुरांना अडीचशे तर पुरुषांना साडेतीनशे रुपये रोजंदारी देऊन अनेक शेतकरी सकाळीच मजुरांच्या घरी चकरा मारताना दिसून येत आहे. त्यात गावाबाहेर जाण्यासाठी मजुरांना चारचाकी वाहनातून न्यावे लागत आहे, तरीही मजूर मिळेनासे झाले आहेत.

त्यात सध्या सर्वत्र विधानसभा निवडणूक असल्याने आठवडाभरापासून गंगापूर व खुलताबाद या दोन मतदारसंघात दिग्गज नेत्यांच्या सभा होत आहेत. रोज एका गावाला किंवा तालुक्‍यात ही सभा असल्याने दोन दिग्गजात सरळ लढत असल्याने ते दोन्ही तालुक्‍यांतील प्रत्येक गावातून पाच ते दहा गाड्या भरून महिला व पुरुष, तरुण भरून नेत आहे.

महिलांना 300 तर पुरुषांना 500 रुपये व जेवण देत असल्याने ग्रामस्थ सभेसाठी जात असल्याने अनेक गावांत दिवसा व सायंकाळी शुकशुकाट दिसत आहे. तुर्काबाद खराडीसह परिसरात अनेक ठिकाणी घरांची बाधकामे सुरू आहेत; मात्र मजुरांअभावी सर्वत्र कामे थांबली असल्याचे सुदर्शन गवळी यांनी सांगितले. जेवण, बसायला गाडी व रोजंदारी रोख मिळत असल्याने मजुरांनी शेतीकडे सध्या पाठ फिरवली आहे.

सालगडीही मिळेना
दरवर्षी विजयादशीपासून शेतावर काम करण्यासाठी वर्षभर अनेक मोठे शेतकरी सालगडी ठेवतात; मात्र सध्या शेतात मिरची तोडणे व कापूस वेचणी सुरू असल्याने त्यातच प्रचारासाठी ग्रामस्थ बाहेरगावी असल्याने गेल्या आठवडाभरात सालगडी शोधून सापडत नसल्याचे शेतकरी बबन गायकवाड यांनी सांगितले.

मिरची तोडणीही पुरेना

सध्या लिंबेजळगाव परिसरात अनेक शेतकऱ्यांनी मिरचीचे पीक घेतले आहे व चांगला पाऊस झाल्याने ते बहरदार व मिरची तोडणीच्या तयारीत आहे. मात्र, मिरचीला मागील पंधरवड्यात 2200 रुपये भाव होता, तो आता 760 ते 800 रुपयांवर आला आहे. मिरची तोडणीसाठी चार रुपये किलोप्रमाणे आहे. मिरची विक्री करूनही त्याचे उत्पन्न निघत नसून ते एका क्विंटलमागे 130 रुपये खर्च घरातून घालावा लागत असल्याचे सतीश खोचे यांनी सांगितले.

रब्बीच्या पेरणीसाठी सुरवात

जिकठाणसह अनेक ठिकाणी सध्या रब्बी हंगामातील ज्वारी पेरणीस सुरवात करण्यात आली आहे. काही ठिकाणी बैल, मजुराच्या साह्याने तर अनेक ठिकाणी टॅंकरच्या साह्याने ज्वारी पेरणी सुरू आहे. अजून पंधरा दिवस ही पेरणी चालेल असे शेतकरी मारुती शेळके यांनी सांगितले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com