Lockdown : लातुरात १७ ऑगस्टनंतर लॉकडाउन नाही

विकास गाढवे
Monday, 10 August 2020

जिल्हाधिकारी श्रीकांत यांची माहिती 

लातूर : शहरासह परिसरातील वीस गावांत एक ऑगस्टपासून लागू केलेला लॉकडाउन गुरुवारपासून (ता. १३) शनिवारपर्यंत (ता. १५) टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येणार आहे. १७ ऑगस्टनंतर लॉकडाउनची भाषा होणार नाही. राज्य सरकारने बंदी घातलेल्या गोष्टी सोडून सर्व व्यवहार सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत सुरू राहणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सोमवारी (ता. दहा) पत्रकार परिषदेत दिली. 

जिल्हाधिकारी श्रीकांत म्हणाले, ‘‘लॉकडाउन उघडण्याबाबत लोकप्रतिनिधींचे एकमत झाले आहे. त्यापूर्वी कोरोनावाहक असलेल्या सुपर स्प्रेडर्स घटकांची व्यापक प्रमाणात रॅपिड अँटीजेन टेस्ट होणार असून, येत्या काळात अँटीजेन टेस्ट मोठ्या संख्येने करण्यासाठी एक लाख किटची मागणी केली आहे.

लॉकडाउन उघडल्यानंतर गर्दी होण्याची शक्यता असलेल्या दुकानांतील व्यापारी व विक्रेत्यांची शनिवारपर्यंत अॅंटीजेन टेस्ट करून त्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यास मदत होईल. १७ ऑगस्टनंतर लॉकडाउन केला जाणार नाही. सरकारकडून बंदी असलेले व्यवहार सोडून अन्य सर्व व्यवहार सकाळी सात ते सायंकाळी सात असे नियमितपणे सुरू ठेवण्यात येणार आहेत. त्यापूर्वी अँटीजेन टेस्टसाठी गुरुवारपासून लॉकडाउन शिथिल करण्यात येणार आहे. कोविड केअर सेंटरवरील भार कमी करण्यासाठी घरीच विलगीकरणाला (होम आयसोलेशन) प्राधान्य देण्यात येणार आहे. रुग्णांना जिल्ह्यात उपचारासाठी आग्रह धरता येत नसला तरी बाहेर जाण्यापूर्वी तेथील बेड उपलब्धतेची खातरजमा करून घेण्यात येणार आहे.’’ जिल्ह्यात आतापर्यंत २४ हजार ९० तपासण्या करण्यात आल्या असून, यात स्वॅब घेऊन १६ हजार ३१७ तर रॅपिड अँटीजेन किटच्या साह्याने सात हजार ९७३ तपासण्यांचा समावेश असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे यांनी सांगितले. 

लाखोंचे पॅकेज नाकारुन अंकिताने देशसेवेसाठी ‘यूपीएससी’त मिळविले यश  
 
त्यांनाच क्वारंटाइन करणार 
पॉझिटिव्ह अहवाल येणे म्हणजे शरमेची बाब नाही. लोकांनी आता तपासणीसाठी मानसिकता बदलली पाहिजे. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांना आपल्या परिसरात राहू देऊ नये, अशी मागणी काही नागरिक करीत आहेत. गरज पडल्यास अशी मागणी करणाऱ्या रहिवाशांनाच संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात येणार आहे, असा इशारा जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी दिला. डॉक्टर व कर्मचारी कोरोनाच्या लढाईतील सैनिक असून, त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, असेही श्रीकांत यांनी स्पष्ट केले. 

राष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा   
 
लॉकडाउन १७ ऑगस्टपासून उठणार ः देशमुख 
लातूर जिल्ह्यात ता. १ ऑगस्टपासून लागू करण्यात आलेले लॉकडाउन येत्या ता. १३ ऑगस्टपासून शिथिल करण्यात येणार आहे. तर १७ ऑगस्टपासून मागे घेण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.  शहराच्या सीमांवर अधिक दक्षता बाळगण्याचे काम संबंधित यंत्रणा आता करणार आहेत. जिल्ह्यात; तसेच शहरात प्रवेश करणाऱ्यांच्या तपासण्या करण्यावर अधिक लक्ष द्यावे लागेल. कोविड-१९ नियंत्रणासाठी १ लाख रॅपिड अॅंटीजेन टेस्ट केल्या जातील. यासाठी खासगी लॅबचेही सहकार्य घेतले जाणार आहे, अशी माहिती श्री. देशमुख यांनी दिली. 

(संपादन : विकास देशमुख)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No lockdown in Latur after 17th August