खतासाठी पैसे मिळाले नाहीत, बीडच्या शेतकऱ्याने संपवले जीवन 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जुलै 2020

तटबोरगाव येथील शेतकरी मल्लिकार्जुन यांनी २६ जूनला विष घेतले. त्यांना उपचारासाठी लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान बुधवारी (ता. एक) त्यांचा मृत्यू झाला.

धानोरा (जि. बीड) - उसाला खत टाकण्यासाठी पैसे मिळाले नाहीत. कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून शेतकऱ्याने जीवन संपविल्याची घटना तटबोरगाव (ता. अंबाजोगाई) येथे घडली आहे. मल्लिकार्जुन परिहार शितोळे (वय ४०) असे मृताचे नाव आहे. 
तटबोरगाव येथील शेतकरी मल्लिकार्जुन यांनी २६ जूनला विष घेतले. त्यांना उपचारासाठी लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान बुधवारी (ता. एक) त्यांचा मृत्यू झाला.

त्यांना पाच एकर जमीन असून, काही वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीमुळे सतत नापिकी होत होती. डोक्यावर बँकेचा साडेसात लाखांचा कर्जाचा बोजा, आईचा रुग्णालयाचा सततचा खर्च, अपंग भाऊ आणि घरगाडा चालवण्याची संपूर्ण जबाबदारी असल्याने मल्लिकार्जुन यांना नैराश्याने ग्रासले होते. शेतीत उत्पन्न मिळत नव्हते. गेल्या वर्षी परतीचा पाऊस चांगला झाल्याने ऊस लागवड केली. जूनमध्ये चांगला पाऊस झाल्याने उसाला खत टाकायचे होते. खत टाकण्यासाठी पैसे कुठूनच न मिळाल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. त्यांच्यामागे आई-वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No money for fertilizer, Beed farmer dies