अँटिजेन चाचणी केंद्रात नियोजनाचा अभाव, उस्मानाबादेतील कोरोना संसर्ग अशाने संपेल का?

सयाजी शेळके
Monday, 28 September 2020

उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयातील अँटिजेन चाचणी केंद्र सातत्याने टीकेचे केंद्र बनत आहे.

उस्मानाबाद : जिल्हा रुग्णालयातील अँटिजेन चाचणी केंद्र सातत्याने टीकेचे केंद्र बनत आहे. सोमवारी (ता.२८) सकाळी नऊ वाजल्यापासून नागरिकांनी अँटिजेनसाठी जिल्हा रुग्णालयात नागरिकांनी रांग लावल्या होत्या. काही नागरिक पालिकेच्या अँटिजेन केंद्राकडे गेले असता त्यांना स्थानिक रहिवाशी असल्याचा पुरावा मागविण्यात आल्याने मनस्ताप करीत माघारी परतावे लागले.

कोरोना संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी शासनस्तरावर विविध उपायोजना केल्या जात आहेत. `माझे कुटुंब माझी जबाबदारी` अशी मोहिम राज्य शासनाने सुरू केली आहे. यामध्ये एखाद्या व्यक्तीस कोरोना सदृश्‍य लक्षणे जाणवत असल्यास तात्काळ कोरोना चाचणी करून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी अँटिजेन चाचणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. उस्मानाबाद शहरातील जिल्हा रुग्णालयातही ही सेवा आहे.

शासकीय यंत्रणा, माध्यमे यांच्या गैरव्यवस्थापनाने कोरोनाची भीती वाढली

मात्र मागील आठवड्यात अँटिजेन चाचणीचे केंद्रात वेळेवर अहवालच दिला जात नसल्याच्या तक्रारी आल्या होत्या. तसाच काहीसा प्रकार सोमवारी पाहायला मिळाला. पंधरा ते २० नागरिक सकाळी नऊ वाजल्यापासून अँटिजेन केंद्रावर तपासणीसाठी आले होते. मात्र तेथे कोणीही नसल्याने सुमारे तीन तास सर्वांना ताटकळत बसावे लागले. यामध्ये काही वयोवृद्ध नागरिकही होते. अखेर ११ वाजताच्या सुमारास तेथे अँटिजेन चाचणी घेणारे पथक आले.

एका मृत व्यक्तिचा स्वॅब घेण्यासाठी बाहेर गेल्याचे तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. जिल्हा रुग्णालयातील अँटिजेन चाचणी केंद्र बंद असल्याने शहरात पालिकेच्या वतीने सुरू असलेल्या अँटिजेन चाचणी केंद्रावर यातील काही नागरिक गेले. मात्र त्यांना तेथे उपस्थित असलेल्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक रहिवाशी असल्याचा पुरावा मागितला. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करत पुन्हा जिल्हा रुग्णालयात यावे लागले. अखेर ११ वाजता तेथील अँटिजेन चाचणी केंद्र सुरू झाले. त्यामुळे सर्व सुविधा असताना केवळ नियोजनाचा अभाव असल्याने नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे दिसून आले.

संपादन - गणेश पिटेकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No Planning At Antigen Test Center Osmanabad News