esakal | लातूर जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव नाही, बाप्पाची घरी स्थापना करण्यास परवानगी
sakal

बोलून बातमी शोधा

Lord Ganesh

लातूर जिल्ह्यात या वर्षी सार्वजनिक ठिकाणी गणेशमूर्तीची स्थापना करता येणार नाही. कोरोनामुळे जिल्ह्यातील बहुतांश गणेश मंडळांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. या स्थितीत परंपरा म्हणून साजरा केल्या जाणाऱ्या मंडळांनी मंदिरात किंवा पदाधिकाऱ्याच्या घरी श्रीची स्थापना करण्यास परवानगी देण्यात येणार आहे.

लातूर जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव नाही, बाप्पाची घरी स्थापना करण्यास परवानगी

sakal_logo
By
विकास गाढवे

लातूर : जिल्ह्यात या वर्षी सार्वजनिक ठिकाणी गणेशमूर्तीची स्थापना करता येणार नाही. कोरोनामुळे जिल्ह्यातील बहुतांश गणेश मंडळांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. या स्थितीत परंपरा म्हणून साजरा केल्या जाणाऱ्या मंडळांनी मंदिरात किंवा पदाधिकाऱ्याच्या घरी `श्री`ची स्थापना करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. अशा गणेशोत्सवासाठी चार पदाधिकाऱ्यांना रोजच्या पूजा विधीसाठी पोलिसांकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी गुरूवारी (ता.२०) रात्री फेसबुक लाईव्ह कार्यक्रमातून ही माहिती दिली.

वाचा : मांजरा धरणातील मृतसाठा भरला, लातूरचा एक वर्षाचा पाणी प्रश्न मिटला


कोरोनामुळे सार्वजनिक गणेशोत्सवावर मोठ्या मर्यादा आल्या आहेत. सुरवातीला मर्यादा व बंधने घालूच सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी दिली होती. मात्र, स्थानिक प्राधिकरणाला त्यासाठी अधिकार दिले होते. काही दिवसांपासून पोलिस व महसूल प्रशासनाकडून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समिती तसेच गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात आल्या. यात कोरोनामुळे यंदा गणेशोत्सव साजरा न करण्याचा एकमुखी निर्णय जिल्ह्यातील बहुतांश गणेश मंडळांनी घेतला.


७० टक्के मंडळांनी या निर्णयात सहभाग दिला. मानाच्या तसेच वर्षानुवर्षाची परंपरा जपणाऱ्या गणेश मंडळाचा प्रश्न पुढे आला. त्यावर या मंडळांनाही सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी परवानगी नाकारली आहे. या मंडळांना मंदिरात किंवा मंडळाच्या एका पदाधिकाऱ्याच्या घरी `श्री`ची स्थापना करून गणेशोत्सव साजरा करता येणार आहे. यात केवळ चार पदाधिकाऱ्यांना रोज `श्री`ची आरती करता येणार असून या पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून परवानगी घ्यावी लागणार आहे.

हेही वाचा : आई झाली भावूक, तहसीलदार मुलाने सहा महिन्यानंतर घेतली भेट

`श्री`ची स्थापना केलेल्या पदाधिकाऱ्याचे घर असलेल्या भागात कंटेंटमेंट झोन स्थापन झाल्यासही चार पदाधिकाऱ्यांना पूजेसाठी जाता येणार असल्याचे श्रीकांत यांनी सांगितले. दरम्यान गेल्यावर्षी घेतलेल्या उंच गणेशमुर्तींच्या विसर्जनाबाबत दोन दिवसांत निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चांगले काम करणाऱ्या गणेश मंडळांचा जिल्हा प्रशासनाकडून सत्कार केला जाईल. गणेशमूर्तीचे घरीच विसर्जन करावा. निर्माल्याच्या संकलनासाठी स्वतंत्र घंटागाडीची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

त्या मंडपात सामाजिक उपक्रम
या अगोदर सरकारच्या धोरणानुसार सहा ऑगस्ट रोजी बंधने घालून सार्वजनिक गणेशोत्सवाला परवानगी दिली होती. त्यानुसार काही मंडळांनी मंडपाची उभारणी केल्याचे सांगितले आहे. या मंडपात दहा दिवस सामाजिक उपक्रम घेण्याची सूचना श्रीकांत यांनी केली आहे. रक्तदान शिबीरासह कोरोना प्रतिबंधासाठी जनजागृतीचे कार्यक्रम घ्यावेत. सफाई कर्मचारी, परिचारिका, डॉक्टर व पोलिस आदी कोरोना योद्ध्यांचा गौरव करावा, अशी सूचनाही श्रीकांत यांनी केली आहे. सर्व लोकांच्या जीवनाचा व आरोग्याचा विषय असल्याने सार्वजनिक गणेशोत्सवाला परवानगी देण्याचा फेरविचार करता येणार नाही. यंदा स्थापना केली नाही म्हणून पुढील वर्षी परवानगी दिली जाणार नाही, असा प्रकार होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

(संपादन  : गणेश पिटेकर)

loading image
go to top