esakal | पडक्या घरांचा आसरा; पुनर्वसन रखडले, गणेशोत्सव साजरा कसा करणार?
sakal

बोलून बातमी शोधा

Village

सात्रापोत्रा साठवण तलावासाठी वर्ष २००४ मध्ये जमिनींचे संपादन होऊन २००८-०९ मध्ये जमिनीचा मावेजा मिळाला. मात्र, बाधित कुटुंबाचे अद्याप पुनर्वसन झालेले नाही. त्यामुळे याच पडक्या घरांत कुंभारीकरांना राहावे लागत आहे.
आपल्या मागण्यांसाठी लक्ष वेधण्यासाठी कुंभारीकरांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावरच बहिष्कार टाकला.

पडक्या घरांचा आसरा; पुनर्वसन रखडले, गणेशोत्सव साजरा कसा करणार?

sakal_logo
By
सुरेश रोकडे

नेकनूर (जि.बीड) : सात्रापोत्रा साठवण तलावासाठी वर्ष २००४ मध्ये जमिनींचे संपादन होऊन २००८-०९ मध्ये जमिनीचा मावेजा मिळाला. मात्र, बाधित कुटुंबाचे अद्याप पुनर्वसन झालेले नाही. त्यामुळे याच पडक्या घरांत कुंभारीकरांना राहावे लागत आहे.
आपल्या मागण्यांसाठी लक्ष वेधण्यासाठी कुंभारीकरांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावरच बहिष्कार टाकला. नंतर अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर तो मागे घेतला; परंतु त्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही.

त्यामुळे पडक्या घरातच लक्ष्मी व गणपती सण साजरा करावा लागणार आहे. या भागातील शेतकऱ्यांनी कमी मावेजा असतानाही पाणीप्रश्न सुटेल या आशेने आपल्या जमिनी तलावासाठी दिल्या; मात्र पंधरा वर्षे झाले तरीही हा तलाव मार्गी लागत नाही. पुनर्वसनासाठी जागा दिली; पण घरांचा मावेजा अद्याप दिला नाही. त्यामुळे नवीन ठिकाणी घरे बांधण्यात आली नाहीत. हा प्रकल्प केंद्र शासनाच्या बळिराजा प्रकल्प योजनेत घेण्यात आला असून, त्याला निधीही मोठ्या प्रमाणात आला; पण सरकारी अधिकाऱ्यांच्या दप्तर दिरंगाईमुळे हे काम पूर्णत्वास जात नाही.

कोरोनामुळे शिक्षणात सावळा गोंधळ, विद्यार्थी अध्ययनापासून दूर

या तलावात जवळपास २५० एकर जमीन जाते. लोकांनी विरोध न करता जमिनी दिल्या; पण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकल्प झाला नाही. या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई झाली पाहिजे या मागणीसाठी कुंभारी येथील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला; परंतु त्यांची समज काढून बहिष्कार मागे घ्यायला लावला. त्यानंतर तरी हे काम मार्गी लागेल अशी आशा असतानाही अद्यापपर्यंतही हा प्रश्न मार्गी लागला नसल्याने ग्रामस्थांचे मात्र हाल होत आहेत.

इतर गावांतील प्रकल्प पूर्णत्वास
सारणी सांगवी, तांदळवाडी आणि कुंभारी प्रकल्पाला सोबतच मंजुरी मिळाली होती. यातील सारणी सांगवी आणि तांदळवाडी येथील प्रकल्प पूर्णत्वास गेला आणि तेथील परिसरात सुजलाम सुफलाम झाला तरी ही अद्यापपर्यंत कुंभारी येथील प्रकल्प पूर्णत्वास गेला ना येथील ग्रामस्थांचे पुनर्वसन झाले नाही, ना त्यांना मावेजा मिळाला नसल्याने गावातील अनेक कुटुंबं आजही पडक्या घरांतच दिवस काढत आहेत.

(संपादन - गणेश पिटेकर)