खरेदी केंद्र बंद, रेशीम विक्री औसा तालुक्यात खोळंबली

Sericulture
Sericulture

औसा (ता.लातूर) ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात टाळेबंदी घोषित झाल्यामुळे तालुका परिसरातील दहा गावांच्या जवळपास ११७ रेशीम उत्पादक शेतकऱ्यांचे हाती आलेले उत्पादन शासनाचे खरेदी केंद्र बंद असल्यामुळे विक्री खोळंबली आहे. नवीन उत्पादनासाठी अंडपुंज उत्पादन केंद्र बंद असल्यामुळे चालू हंगाम हातचा गेल्याने ते अडचणीत आले आहेत. तरी शासनाची खरेदी केंद्र त्वरित सुरू करावीत, अशी मागणी आहे.


परिसरातील आशिव, आलमला, बेलकुंड, भादा, भेटा, बोरगाव (नाव्होली), भांगेवाडी, वाघोली, कारजगाव आणि यल्लोरी अशा दहा गावांतील जवळपास ११७ शेतकरी तुतीची लागवड करून रेशीम कोश उत्पादन करतात. ही शेती दुष्काळ आणि अवर्षणग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान असून रेशीम कोश तयार होऊन विक्रीस येण्याचा हंगाम केवळ तीन महिन्यांचा असल्याने वर्षातून चार हंगाम उत्पादनासाठी मिळतात. शिवाय एक एकरमध्ये एका हंगामाचे साधारणतः ७५ हजार ते लाखांपर्यंत उत्पन्न पदरात पडते. यंदा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र टाळेबंदी झाल्यानें केंद्र सरकार पुरस्कृत असलेले कर्नाटक राज्य शासनाचे बंगळूरु येथील विक्री केंद्र तसेच महाराष्ट्र राज्यातील शासनाचे बारामती, जालना ही केंद्र बंद आहेत.

त्यामुळे हाती आलेला माल विक्रीसाठी अडचणी आल्या आहेत. कोश निर्मितीनंतर पाच ते आठ दिवसांच्या आत नाही विक्री झाल्यास त्या कोशातून फुलपाखरू बाहेर पडते व नुकसान होते. त्यामुळे यंदा अनेकांनी उत्पादित रेशीम कोशांचा माल वाफ देऊन (ड्राय करून) ठेवला आहे. या बंदच्या काळात खासगी व्यापारी केवळ दोनशे रुपये प्रतिकिलो दर देत आहेत. तो परवडणारा नाही. शिवाय नवीन हंगामात तुतीच्या झाडांना पाला (कोशअळीचे खाद्य) भरपूर आला आहे. तर महाराष्ट्रात एकमेव असलेले गडहिंग्लजचे (जि. कोल्हापूर) अंडपुंज निर्मिती केंद्र बंद झाले आहे. तर वाहतूक बंदअभावी परराज्यांतून अंडपुंज खरेदीसाठी जाणे शक्य नसल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. तरी राज्य शासनाने रेशीम खरेदी केंद्र आणि अंडपुंज निर्मिती केंद्र सुरू करून दिलासा द्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.


प्रत्येक हंगामात रेशीमकोश हाती आल्यानंतर राज्यातील खरेदी केंद्रावर किंवा कर्नाटकातील रामनगर बंगळूरु येथे विकून येताना अंडपुंज खरेदी करून नवीन हंगाम सुरू होतो. यावेळी कोरोना विषाणूच्या झटक्याने या शेतकऱ्यांचे सालखर्ची बजेट कोलमडले असून कोशअळीच्या अंडपुंज उपलब्धतेअभावी हा हंगाम पुरता वाया गेला आहे.
- रविशंकर बिराजदार, रेशीम कोश उत्पादक शेतकरी, आलमला (ता. औसा)

रेशीम अंडपुंज निर्मिती केंद्र गडहिंग्लज (जि. सातारा) येथील केंद्रांत २० मार्चपर्यंत आलेल्या ऑर्डरप्रमाणे तयार असलेले रेशीम कोश अंडपुंज (बीज) ३० मार्चपर्यंत वाटप करून केंद्र बंद करण्यात आले.
- एन. एस. नियोगी, रेशीम अंडपुंज निर्मिती केंद्र, गडहिंग्लज
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com