esakal | पावसाळ्यातही उन्हाळ्याप्रमाणेच हाल 
sakal

बोलून बातमी शोधा

बदनापूर : पावसाळ्यातही सोमठाणा येथील कोरडाठाक पडलेला दुधना प्रकल्प. 

बदनापूर तालुका :  पावसाने पाठ फिरविल्याने अनेक गावांत टॅंकरचे पाणी, सिंचन प्रकल्प कोरडेठाक 

पावसाळ्यातही उन्हाळ्याप्रमाणेच हाल 

sakal_logo
By
आनंद इंदानी

बदनापूर (जि.जालना) -  तालुक्‍यात यंदा पुन्हा अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने जमिनीतील पाणीपातळीत अजिबात वाढ झालेली नाही. तालुक्‍यातील सर्वच सिंचन प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. विहिरींनीही तळ गाठला आहे. बहुतांश गावांत अगदी उन्हाळ्यासारखी टंचाई कायम आहे. सध्या तालुक्‍यातील 33 गावे व 10 वाडी-तांड्यांसाठी 38 टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. शिवाय आणखी काही टंचाईग्रस्त गावांतून टॅंकर सुरू करण्याची मागणी होत आहे. 
बदनापूर तालुक्‍यात वर्ष 2012 पासून दुष्काळाचे ग्रहणच लागले आहे. अर्थात, मध्यंतरीची एक-दोन वर्षे सरासरीएवढा पाऊस झाला. मात्र, उर्वरित वर्षांत पावसाने पाठ दाखविली. त्यात सातत्याने वातावरणातील उष्णता वाढत असल्यामुळे भूगर्भातील जलसाठा झपाट्याने खालावत गेला. सध्या तालुक्‍यातील अनेक भागांत 350 फूट जमिनीत खोदल्यावर पाणी लागत नाही, अशी भयानक अवस्था आहे. मागील दोन वर्षांपासून दुष्काळ चांगलाच गांजत आहे. 

शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले, बाजारात मंदी 
पावसाच्या लहरीपणाचा फटका कृषी क्षेत्राला बसला आहे. खरीप पिकांचे उत्पन्न कमालीचे घटले. तर दोन वर्षांपासून रब्बी हंगामात अनेक शेतकऱ्यांनी पीकपेरा केला नाही. शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न घटल्याने क्रयशक्‍तीही राहिलेली नाही. परिणामी ग्रामीण बाजारपेठेतही मंदीची लाट पसरली आहे. 

पिके वरवर हिरवी, जमीन तहानलेली 
तालुक्‍यात मागच्या वर्षी भीषण दुष्काळी परिस्थिती होती. यंदा यात सुधार होईल, अशी अपेक्षा असताना पुन्हा पावसाने हाराकिरी केली. मागील तीन महिन्यांत कुठेही पावसाचा जोर दिसून आला नाही. अगदीच शिडकावा मारण्यासारखा पाऊस झाला. या पावसामुळे खरीप पिके कशीबशी तगली. मात्र, जमिनीत वितभरही ओल नसल्यामुळे जमिनीची तहान भागलीच नाही. त्यामुळे जमिनीची पाणीपातळी वाढण्यास काहीच मदत मिळाली नाही. परिणामी जलस्रोत कोरडेठाक पडले आहेत. कूपनलिका व विहिरींनीही तळ गाठला आहे. पावसाळ्याचा केवळ एक महिना शिल्लक आहे. त्यात अशी भीषण अवस्था असताना परतीच्या पावसाने धोका दिल्यास उन्हाळ्यात टंचाईची परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्‍यता आहे. 

भरपावसाळ्यात टॅंकरने पाणी 
बदनापूर तालुक्‍यात सप्टेंबर महिन्याच्या पावसाळ्यातही नागरिकांना पाण्याचा शोध घ्यावा लागत आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंत टॅंकर सुरू ठेवण्याची तालुक्‍याच्या इतिहासात बहुधा ही पहिलीच वेळ असावी. टंचाईग्रस्त कडेगाव, डोंगरगाव, सायगाव, तळणी, लोधेवाडी, बुटेगाव, माळेगाव, चनेगाव, भातखेडा, ढासला-पीरवाडी, कुसळी, सागरवाडी, पाडळी-रामखेडा, रोषणगाव, वाकुळणी, ढोकसाळ, बाजार वाहेगाव, मांजरगाव, तुपेवाडी, वंजारवाडीअंतर्गत वाड्या, खामगाव, भाकरवाडी, देवगाव, कुंभारी, कडेगाव, पीरसावंगी, मालेवाडी, कस्तुरवाडी, गोकुलवाडी, घाटी सिरसगाव, हलदोला, चिखली, अकोला, दगडवाडी अशा 33 गावे 10 वाड्यांत सध्या टॅंकरने पाणीपुरवठा होत आहे; तसेच यासाठी 39 खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. 

टॅंकर भरण्यासाठी बदनापूरला पॉइंट हवा 
तालुक्‍यातील टॅंकरला शेंद्रा-जालना औद्योगिक वसाहतीच्या योजनेतून जालना येथून पाणीपुरवठा होतो. बदनापूर ते जालना हे अंतर जास्त असल्यामुळे त्याचा परिणाम टॅंकरच्या फेऱ्यांवर होतो. या योजनेची जलवाहिनी बदनापूर शहरातून जात असल्यामुळे बदनापूर येथील अपर दुधना प्रकल्पाच्या कार्यालयासमोरील जलवाहिनीच्या व्हॉल्व्हमधून पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी टंचाईग्रस्त गावांतील सरपंच करीत आहेत. 

loading image
go to top