#Sakal_Ground_Report : हाताला काम नाही, आमच्यासाठी कसली दिवाळी? 

 No work, no Diwali for us
No work, no Diwali for us

औरंगाबाद - सकाळी साडेसात-आठ वाजता घरातून बाहेर पडायचे. कामगार नाक्‍यावर जाऊन थांबायचे. कधी काम मिळते तर कधी नाही. आता कामंबी मिळत नाहीत. कधी कधी दुपारी दोन वाजेपर्यंत काम मिळत नाही. मग आल्यापावली घराकडं जावं लागतं. घरी गेल्यावर बायको, लेकरांचे केविलवाणे चेहरे बघायची वेळ येते. उपाशीपोटी राहावं का कुठं जीव द्यावा, अशी अवस्था झाली असल्याचे हताश उद्‌गार जवळपास शहरातील सर्वच कामगार नाक्‍यावर हातावर पोट असलेल्या कामगारांकडून ऐकायला मिळत आहेत. 

आधी मंदी आणि नंतर आता निवडणुका यामुळे बांधकामे ठप्प झाली आहेत. यामुळे बांधकाम मजुरांच्या हाताला काम नाही. हे मजूर रोज शहरातील कामगार नाक्‍यावर कामाच्या शोधात येऊन थांबतात. शहरात आठ ते दहा कामगारनाके आहेत. यात पीरबाजार उस्मानपुरा, सिडको एन-चार येथील कामगार चौक, शहागंज, टी. व्ही. सेंटर आणि पुंडलिकनगर तिरुमंगल कार्यालयाजवळ हे मोठे नाके आहेत. पुंडलिकनगरातील कामगार नाक्‍यावर बाहेरच्या राज्यातून आलेले हिंदी बोलणारे कामगार थांबतात. सर्व नाक्‍यावर मिळून हजारो कामगार असतील. सकाळी साडेआठ पावणेनऊ वाजता नाक्‍यावर कामाचा शोध घेत उभे राहावे लागते. या नाक्‍यावर सकाळीच कामगार डबे घेऊन येऊन कामासाठी उभे राहतात. एखादी व्यक्‍ती मजुराच्या शोधात आली तर आपल्याला काम मिळावे म्हणून त्याच्या भोवती कामगारांचा गराडा पडतो. मग अशा अडचणीत सापडलेल्या मजुरांना मिळेल तेवढ्या मजुरीवर कामासाठी जावे लागते. 

मजुरी मिळते कमी 

वास्तविक पाहता बिगारी काम करणाऱ्याला तीनशे तर कारागिरांना चारशे-पाचशे रुपये मिळतात; पण सध्या कामेच नसल्याने त्यांना कमीच पैसे दिले जात असल्याचे कामगारांनी सांगितले. 
असंघटित कामगारांसाठी काम करणारे मधुकर खिल्लारे यांनी सांगितले, कामगार उपायुक्‍त कार्यालयाकडे गेल्यावर्षी 70 हजार कामगारांची नोंद करण्यात आली होती; मात्र यावर्षी 50 टक्‍के कामगारांनी नूतनीकरण केलेले नाही. म्हणजेच हे बोगस कामगार नोंदवण्यात आले होते; कारण नूतनीकरण करताना कुणाकडे काम केले याचे प्रमाणपत्र व अन्य कागदपत्रे द्यावे लागतात. आधीच मंदीमुळे बांधकाम व्यवसाय ठप्प झाल्याने कामे नाहीत आणि आता तर निवडणुकीचे वातावरण आहे. सर्व कामे बंद असल्याने हातावर पोट असलेल्या कामगारांची दिवाळी यंदा अंधारातच जाणार आहे. कामगार उपायुक्‍त कार्यालयाकडे पैसा असला तरी एकीकडे नोंदणीकृत कामगारांना पैसे मिळत नाहीत अन्‌ दुसरीकडे हाताला कामही मिळत नाही. कामे मिळत नसतील तर या नोंदणीकृत कामगारांना किमान भत्ता तरी दिला पाहिजे असे मत व्यक्‍त केले. 

पंधरा दिवसांपासून कामच नाही 

सुभाष पिराजी गायकवाड : आता पंधरा दिवस झाले कामच नाही. कधी एक दिवस काम लागतं तर कधी आठ आठ दिवस घरी बसावं लागतं. मी पिसादेवीजवळच्या मांडकीचा आहे; पण आता इथंच राजनगरमध्ये राहतो. काम मिळालं नाही तर परत घराकडं तोंड बारीक करून जावं लागतं. एन-चारच्या कामगार चौकात मी थांबत असतो. घरची मंडळी भांडी घासायला जाते. त्यातूनच खर्च कसातरी धकतो. आता कामंच नाही तर दिवाळी कसली आलीय. 


उपाशीपोटी राहावं का? 

अण्णासाहेब ढोकळे : पिसादेवी आमचं गाव. कामासाठी इथंचं शिवशाहीनगरमध्ये राहतो. इथून तीन किलोमीटर दूर आहे. मातीकाम करतो. रोज काम मिळंल या आशेनं इथं येतो; पण कामधंदे नाहीत, आम्ही उपाशीपोटी राहावं का रेल्वेपटरीखाली जावं असं झालंय. एकतर आमी अशिक्षित. दोन तीन घंटे थांबावं लागतं. काम लागलं नाही तर गुपचूप घरी जावं लागतं. गरिबीत गरिबी दिवाळीत दोन अडीचशेचा ड्रेस घ्यायचा अन्‌ गप बसायचं दुसरं काय. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com