esakal | शिवेंद्रसिंहराजेच नाही, तर अनेक नेते राष्ट्रवादीत येणार; शरद पवारांच्या विश्वासू नेत्याचा पक्का दावा
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

हा सोहळा काही दिवसातच आयोजित केल्या जाणार असल्याचे परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी सोमवारी (ता. २५) पत्रकार परिषदेत सांगितले. 

शिवेंद्रसिंहराजेच नाही, तर अनेक नेते राष्ट्रवादीत येणार; शरद पवारांच्या विश्वासू नेत्याचा पक्का दावा

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी : आमदार शिवेंद्रराजे यांच्यासह भाजपमध्ये गेलेल्या अनेक विद्यमान व माजी आमदारांचा लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. हा सोहळा काही दिवसातच आयोजित केल्या जाणार असल्याचे परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी सोमवारी (ता. २५) पत्रकार परिषदेत सांगितले. 

प्रजासत्ताक दिनानिमित्य परभणी आलेले पालकमंत्री नवाब मलिक यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन समितीची बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, पोलिस अधीक्षक जयंत मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर आदींची उपस्थिती होती.

साताराचे भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नुकतीच भेट घेतली होती. त्यानंतर त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाची चर्चा सुरु झाली आहे. या चर्चेला दुजोरा देत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी त्यांच्यासह अनेक माजी आणि विद्यमान आमदारांचा लवकरच प्रवेश सोहळा होणार असल्याचे सांगितले. भाजपमध्ये गेलेले 100% लोक वापस येण्यास इच्छुक आहेत. मात्र, त्या सर्वांचाच प्रवेश करून घेणे शक्य नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. परंतू निवडक लोकांचा प्रवेश सोहळा लवकरच होणार असल्याचे ते म्हणाले.

मराठवाड्यात विकासाचा अनुशेष मोठ्या प्रमाणात आहे. शिवाय परभणीत देखील दरडोई उत्पन्न वाढविण्याची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातील युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी खादी निर्मितीचा पायलट प्रोजेक्ट या ठिकाणी उभ्या केल्या जाणार आहे. सध्या खादीचा ट्रेंड असून रेमंड, अरविंद सारख्या कंपन्या दोन हजार रुपये मीटर एवढ्या दराने खादीची विक्री करत आहेत. तेव्हा परभणीतील जवळपास अडीच हजार लोकांना रोजगार देण्याच्या दृष्टिकोनातून हा खादी निर्मीतीचा पायलट प्रोजेक्ट माझ्या खात्यांतर्गत उभा केल्या जाणार असल्याची घोषणा पालकमंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. या माध्यमातून अडीच हजार घरांमध्ये चरखा देऊन घरातूनच खादी निर्मितीची संकल्पना त्यांनी मांडली. या माध्यमातून एका कुटुंबाला दरमहा साधारणपणे पंधरा हजार रुपयांचे उत्पन्न होणार असल्याचे देखील ते म्हणाले.

गेल्या अनेक दिवसांपासून परभणीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागणीवरून परभणीकरांनी आंदोलन छेडले आहे. या पार्श्वभूमीवर कालच पालकमंत्री नवाब मलिक यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन या संदर्भातील ठराव नियोजन समितीच्या बैठकीत पारित करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार हा ठराव पारित केल्याची माहिती त्यांनी या पत्रकार परिषदेत दिली. यासंदर्भातील ठरावाला मंजुरी देण्यात आली असून, शासनाकडे पाठपुरावा करून परभणीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रश्न लवकरच मार्गी लावू, असे देखील त्यांनी सांगितले. शिवाय केंद्र शासनाने या संदर्भातील धोरण बदलल्याने त्याचा स्वीकार करून त्याची अंमलबजावणी देखील लवकरच होणार आहे. त्यामुळे राज्यातील परभणीसह अन्य जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रश्न देखील मार्गी लागणार असल्याचे ते म्हणाले.

संपादन - प्रल्हाद कांबळे