आता नांदेडच्या सिमेवर कॅमेऱ्यांची नजर

mkrmabad.jpg
mkrmabad.jpg


मुक्रमाबाद, (ता. मुखेड, जि. नांदेड) ः ‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने देशात सर्वत्र लॉकडाउन केले असतानाही शेजारी असलेल्या आंध्रप्रदेशातून व कर्नाटक, तेंलगणा राज्यातून रोज हजारो नागरिक महाराष्ट्रात येत असल्याने कोरोनाचा धोका अधिक वाढल्यामुळे या नागरिकांवर आळा घालून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी या राज्य सीमेवर मुक्रमाबाद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक कमलाकर गड्डीमे व मरखेल पोलिस ठाण्याचे साहायक पोलिस निरीक्षक अदित्य लोणीकर यांनी ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविले असून याद्वारे परराज्यातून येणाऱ्या नागरिकांवर पाळत ठेवण्यात येणार असून फूटेज पाहून कारवाई करण्यात येणार असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक कमलाकर गड्डीमे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

दिवसेंदिवस कोरोनाचा विळाखा अधिक घट्ट होत असून सुरक्षेच्या कारणावरून लॉकडाउन केले असतानाही कर्नाटक, तेंलगणा व आंध्रप्रदेश या तिन्ही राज्यांतून रोज हजारोंच्या वर नागरिक महाराष्ट्राच्या हद्दीत प्रवेश करत होते. या तिन्ही राज्यांत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले असतानाही हे नागरिक विनाकारण आपल्या गावपरिसरात फिरून सीमेलगतच असलेल्या महाराष्ट्रातील मुक्रमाबाद, हणेगाव, मरखेल, भूतन हिप्परगा, नागराळ, हंगरगा यासह अनेक गावांत येत असल्यामुळे कोरोनाचा धोका अधिक बळावला आहे. तर मुख्य मार्गाने येत असलेल्या अशा नागरिकांची पोलिसांनी धरपकड चालू केल्यामुळे हे नागरिक पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी मुख्य मार्ग सोडून आडमार्गाने व शेतातून ये-जा करत असल्यामुळे पोलिसांनी अशा मोकाट नागरिकांवर कारवाई करण्यासाठी या तिन्ही राज्यांच्या मुख्य सीमेवर ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसऊन मोबाइल ॲपद्वारे पाळत ठेवत असून या ठिकाणी तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कारवाई
तर मुक्रमाबाद पोलिस ठाण्याकडून कोरोनाचे गांभीर्य ओळखून शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन अगदी काटेकोरपणे अमलात आणले असून २१ मार्चपासून लॉकडाउनच्या काळात आंध्रप्रदेश, कर्नाटक व तेलगंणा या तिन्ही राज्यांच्या सीमा ‘सीसीटीव्ही’च्या नजरकैदेत ठेवण्यात आल्या आहेत. या चेकपोष्टवरून अत्यावश्यक सेवेचे वाहन वगळता इतर वाहनांवर बंदी घालण्यात आलेली आहे. तर नागरिकांना जीवनाश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी सकाळी आठ ते अकराची वेळ देण्यात आली असून या वेळेतच नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवून हव्या असलेल्या वस्तू खरेदी कराव्यात, आकराच्या पुढून रस्त्यावर येऊन संचारबंदीचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.

नागरिक घेत आहेत आडमार्गांचा फायदा 
परराज्यांतून येत असलेल्या नागरिकांवर आळा घालण्यासाठी मुक्रमाबाद पोलिसांनी राज्याच्या सीमेवर ‘सीसीटीव्ही’ बसवून त्या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला असल्यामुळे आता हे नागरिक मुख्य मार्ग सोडून पोलिसांना चकवा देत आडमार्गांनी दऱ्या-खोऱ्यातून पाऊलवाट शोधत महाराष्ट्राच्या हद्दीत असलेल्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात शिरकाव करत असल्यामुळे या नागरिकांची धरपकड करण्यासाठी पोलिसांची चांगलीच धावपळ होत आहे.

 



कोरोनापासून वाचण्यासाठी सरकारने ज्या सूचना दिल्या आहेत त्या सूचनांचे पालन नागरिकांनी आपल्या घरात बसून करायचे आहे. काही नागरिक विनाकारण बाहेर फिरून आपला व आपल्या कुटुंबाचा जीव धोक्यात आणत आहेत. अशा फिरणाऱ्यांवर व त्यांच्या दुचाकी व चारचाकी वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे. घरात बसून प्रशासनाला सहकार्य करा, अन्यथा कारवाईला तयार राहा.
- कमलाकर गड्डीमे, सहायक पोलिस निरीक्षक, मुक्रमाबाद.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com