खासदार निंबाळकरांचा एक फोन, बसला चोवीस तासांत डीपी, शेतकऱ्यांनी मानले आभार

Omprakash Nimbalkar1
Omprakash Nimbalkar1

औसा (जि.लातूर) : कामांच्या बाबतीत प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरणारा खासदार म्हणून उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर ओळखले जातात. त्यांच्या कामाचा अजून एक अनुभव औसा तालुक्यातील बेलकुंड आणि गुळखेडा शिवारात शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना आला. गेल्या मार्चमध्ये बंद पडलेला रोहित्र चालू करावा यासाठी शेतकऱ्यांनी अनेकदा महावितरणचे उंबरठे झिजविले. मात्र त्यांना रोहित्र देण्यासाठी नेहमी टाळाटाळच नशिबी अली.

शेवटी कंटाळून व्हॉट्सॲपवर संदेश केला आणि सहा महिने शेतकऱ्यांना खेळविणाऱ्या महावितरणने चोवीस तासांत रोहित्र (डीपी) बसविला. खासदार निंबाळकर यांच्या तत्परतेची सर्वत्र चर्चा सुरू आहे. औसा तालुक्यातील बेलकुंड आणि गुळखेडा शिवारातील जाधव डीपीवर अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी व कूपनलिका आहेत. यंदा साठवणुकी एवढा पाऊस न झाल्याने अनेकांनी पिकांना जगविण्यासाठी विहिरीतील व कुपनलिकेतील पाणी सिंचनासाठी उपयोगात आणून जगविण्याचा खटाटोप केला होता.

मात्र मार्च महिन्यात जळलेला रोहित्र दुरुस्त करून मिळावा, यासाठी शेतकरी महावितरण कार्यालयास चकरा मारत होते. मात्र तब्बल सहा महिने हा रोहित्र बदलून मिळत नव्हता. या संदर्भात तालुक्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनीही पाठपुरावा केला. मात्र महावितरणला शेतकऱ्यांची दया आली नाही. कोथिंबीर आणि सुकत चाललेला ऊस पाहून या रोहित्रावर जोडणी असलेले शेतकरी वैतागले होते. शेवटचा पर्याय म्हणून गुळखेडा येथील शेतकरी लियाकत शेख यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना व्हॉट्सॲपवर समस्या सांगितली.

क्षणाचाही विलंब न करता श्री.निंबाळकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना ठणकावले की उद्यापर्यंत डीपी नाही बसू द्या... मी पाहतो आता. आणि काही तासातच नवीन डीपी जागेवर पोचली आणि चालुही झाली. सहा महिने शेतकऱ्यांना झुलवत ठेवणाऱ्या महावितरण विभागाला खासदाराचेच इंजेक्शन कामी आल्याची चर्चा परिसरात सुरु आहे. पाणी असुनही पिके सुकू लागली होती. आता या पिकांना पाणी देणे सुरु आहे. "खासदार असावा तर असा" अशी शाबासकीही खासदार निंबाळकर यांच्या बाबतीत शेतकरी देत आहेत.

समस्या असतील तर सांगा
दरम्यान मतदारसंघातील शेतकरी, शेतमजुर आणि सर्वसामान्य लोकांची अधिकारी अडवणुक करीत असतील तर त्याची तक्रार माझ्याकडे करा लोकांची कामे करण्यासाठी आणि त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठीच लोकांनी मला निवडून दिले असल्याची प्रतिक्रिया खासदार ओमराजे निंबाळकारांनी दिली आहे.



गेल्या सहा महिन्यांपासून रोहित्र मिळावे यासाठी सातत्याने पाठपुरावा करूनही मिळत नव्हते. मात्र खासदारांकडे तक्रार केल्यावर रातोरात रोहित्र बसले आणि माझा नऊ एकर ऊस अडीच एकर कोथिंबीर वाचली. खासदार असावा तर असा.
लियाकत शेख. शेतकरी

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com