मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या कामातून गरिबांना मदत : ओमप्रकाश शेटे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

ग्रामीण भागातील गरीब रुग्णांची होणारी परवड ही आजवर सरकारदरबारी फक्त एक ‘फाइल’ असते. मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या कामातून याच फाइलला ‘लाइफ’ बनवता आले, याचे समाधान मोठे असल्याचे उद्गार मुख्यमंत्री सहायता कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी काढले.

औरंगाबाद : ग्रामीण भागातील गरीब रुग्णांची होणारी परवड ही आजवर सरकारदरबारी फक्त एक ‘फाइल’ असते. मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या कामातून याच फाइलला ‘लाइफ’ बनवता आले, याचे समाधान मोठे असल्याचे उद्गार मुख्यमंत्री सहायता कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी काढले. गेल्या पाच वर्षांत राज्यातील २१ लाख गरीब रुग्णांना सुमारे १५ कोटींची मदत मिळवून दिल्याचे सांगत त्यांनी आपल्या कामांचा लेखाजोखाच ‘कॉफी विथ सकाळ’ मध्ये मांडला. शासकीय यंत्रणेतील मर्यादांवर मात करीत गरजू रुग्णांसाठी अधिक मोठ्या स्तरावर काम करता यावे, यासाठीच राजकारणात उतरणार असल्याचेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री सहायता कक्षाची जबाबदारी सांभाळत असताना लाखो गरीब रुग्णांना मदत मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करणारे मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी ओमप्रकाश शेटे यांनी शुक्रवारी (ता.१३) ‘सकाळ’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. ‘सकाळ’च्या मराठवाडा आवृत्तीचे संपादक संजय वरकड यांनी पुस्तक भेट देऊन त्यांचे स्वागत करीत ‘सकाळ’च्या विविध उपक्रमांचीही माहिती दिली. मूळचे उद्योजक असलेल्या शेटे यांनी आजवर केलेल्या रुग्णसेवेच्या कामाबद्दल आणि राजकारणात उतरण्याच्या निर्णयाबद्दल मनमोकळा संवादही साधला.

बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळवून दिलेली मदत, दिंद्रुड आणि आसपासच्या परिसरात केलेली जलसंधारणाची कामे आणि बियाणे वाटपासाठी सीएसआर फंडातून आणलेल्या विक्रमी मदतीबद्दलचे अनुभवही त्यांनी विस्ताराने सांगितले.

मित्राचे आजारपण ठरला टर्निंग पॉइंट

सुमारे १७-१८ वर्षांपूर्वी वर्गमित्राला रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले. त्याच्यावरील महागड्या उपचारांसाठी निधी गोळा करताना या मार्गातील अडचणींना तोंड द्यावे लागले, तोच आपल्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरून रुग्णसेवेचे व्रत स्वीकारल्याचे शेटे यांनी सांगितले. तेव्हापासून ग्रामीण भागांतील गरीब रुग्णांना मुंबईत चांगले उपचार मिळावेत यासाठी मदत देणे सुरू केले. आर्थिक परिस्थिती चांगली असल्याने स्वखर्चातून स्वयंसेवकांचे जाळे उभारले.

शेकडो लोकांना मदत मिळू लागली. वर्ष २०१५ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेच काम हेरून मुख्यमंत्री सहायता कक्षाची जबाबदारी सोपविली. त्यांच्याकडे पाठपुरावा करून २५ हजारांच्या मदतनिधीची मर्यादा क्रमाक्रमाने दोन लाखांपर्यंत वाढवली. गेल्या साडेचार वर्षांत राज्यभरातील सुमारे २१ लाख गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहायता कक्षातून ६०० कोटी, तर धर्मादाय रुग्णालयांच्या माध्यमातून ९०० कोटींची मदत मिळवून देऊ शकलो, असा दावा शेटे यांनी केला.

धर्मादाय रुग्णालयांवर वचक

सरकारकडून अल्पदरात जमीन, वीज, पाणी आणि कर सवलत मिळवणारी रुग्णालये ‘धर्मादाय’ प्रकारात मोडतात. या रुग्णालयांचे नियमित इन्स्पेक्‍शन करून त्यांना गरजूंसाठी राखीव खाटा आणि मोफत उपचार करण्यास भाग पाडले. बड्या रुग्णालयांनी या माध्यमातून आजवर सुमारे ९०० कोटी रुपयांचे उपचार केल्याचे शेटे यांनी सांगितले.

रोज किमान ७०० रुग्ण मदतीसाठी मंत्रालयात येतात. त्या सर्वांना मदत मिळवून देण्याचा आपला प्रयत्न असतो. उपचारांती बरे झालेल्या रुग्णांनी पाठवलेली हजारो आभारपत्रे, हीच आपली कमाई असल्याचे त्यांनी म्हटले. पोलिसांच्या कुटुंबीयांसाठीच्या आरोग्य योजनेचीही चौकट वाढवल्याचे ते म्हणाले.

विशेष कार्य अधिकारी म्हणतात...

मुख्यमंत्री सहायता कक्षाने घडवला इतिहास
२१ लाख गरजू रुग्णांना १५०० कोटींची मदत
बालमृत्यूचे घटवले प्रमाण, गरिबांनाही हृदय प्रत्यारोपण शक्‍य

धर्मादाय रुग्णालये, कॉर्पोरेट फंडाचा पुरेपूर वापर

योजनेच्या कक्षा रुंदावत अधिकाधिक आजारांवर इलाज


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Omprakash Shete says we have helped poor under Government Scheme