esakal | दीड टक्क्याचा मोह पडला भारी, महिला उपजिल्हाधिकाऱ्याला अटक...
sakal

बोलून बातमी शोधा

दीड टक्क्याचा मोह पडला भारी, महिला उपजिल्हाधिकाऱ्याला अटक...

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड नगरपालिकेतील विकास कामासाठी लागणाऱ्या निधीच्या प्रशासकीय मान्यतेसाठी चार लाख ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्यासह एक अभियंता व एक अव्वल कारकूनास लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने मंगळवारी (ता.आठ) ताब्यात घेतले. या प्रकाराची दिवसभर जिल्हाकचेरीसह विविध कार्यालयात चर्चा होती.  

दीड टक्क्याचा मोह पडला भारी, महिला उपजिल्हाधिकाऱ्याला अटक...

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणीः गंगाखेड नगरपालिकेतील विकास कामासाठी लागणाऱ्या निधीच्या प्रशासकीय मान्यतेसाठी चार लाख ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्यासह एक अभियंता व एक अव्वल कारकूनास लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने मंगळवारी (ता.आठ) ताब्यात घेतले.

गंगाखेड नगरपालिकेतील विकासकामाच्या प्रशासकीय मान्यतेसाठी गंगाखेड नगरपालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर प्रशासन विभागाकडे या बाबतचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला मंजूरी मिळविण्यासाठी नगर पालिकेतील एक नगरसेवक निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्याकडे पाठपुरावा करीत होता. मात्र, या प्रस्तावाच्या एकूण रक्कमेच्या दीड टक्केप्रमाणे चार लाख ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी श्रीमती सूर्यवंशी यांनी अन्य दोघा कर्मचाऱ्यांच्यामार्फत केली होती. अशी तक्रार संबंधीत नगरसेवकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल केल्यानंतर सोमवारी (ता.सात) विभागाच्या पथकाने प्रत्यक्ष जिल्हाधिकारी कार्यालयात जावून पडताळणी केली. 

हेही वाचा - राज्यसरकारचा नवा आदेश : कोरोना चाचणीचे दर झाले कमी, आता लागणार फक्त..

पडताळणीत लाच मागितल्याचे स्पष्ट
पडताळणीत नगर प्रशासन विभागातील अव्वल कारकून श्रीकांत विलासराव करभाजने व गंगाखेड पालिकेचे स्थापत्य अभियंता अब्दुल हकीम अब्दुल खयुम यांनी प्रशाकीय मान्यतेसाठीच्या चार लाख ५० हजार रुपयांच्या रक्कमेची मागणी केल्याचे व ही मागणी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्या समंतीवरूनच केल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून मंगळवारी (ता.आठ) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून केलेल्या कारवाईत अव्वल कारकून श्री. करभाजने व अभियंता अब्दुल खयुम यांनी उपजिल्हाधिकारी श्रीमती सूर्यवंशी यांच्या सांगण्यावरून साडेचार लाख रुपयांची रक्कम ताब्यात घेतली. त्याचवेळी पथकाने या दोघांसह श्रीमती सूर्यवंशी यांनाही ताब्यात घेतले. या प्रकरणी नवामोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

हेही वाचा - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी सर्वपक्षीयांची बैठक बोलविणार, परभणीचे खासदार देणार लढा

स्वाती सूर्यवंशी यांच्या मालमत्तेची चौकशी सुरु
उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांना साडेचार लाख रुपयांच्या लाच प्रकरणात अटक झाली आहे. त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी दोन पथके याकामी तयार करून पाठविण्यात आली आहेत.
- भरत हुंबे, पोलिस उपाधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, परभणी.

संपादन ः राजन मंगरुळकर

loading image
go to top