एका दिवसात जमला साडेसहा टन प्लॅस्टिक कचरा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

केंद्र सरकारने प्लॅस्टिकमुक्तीचा नारा देत स्वच्छता ही सेवा हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाच्या पुढे पाऊल टाकत जिल्हा परिषदेने प्लॅस्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. यातच जिल्हा परिषदेने महात्मा गांधी जयंतीदिनी एका दिवशी जिल्ह्यात प्लॅस्टिकमुक्तीसाठी महाश्रमदान करीत तब्बल साडेसहा टन प्लॅस्टिक कचरा संकलित केला आहे. 

लातूर : केंद्र सरकारने प्लॅस्टिकमुक्तीचा नारा देत स्वच्छता ही सेवा हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाच्या पुढे पाऊल टाकत जिल्हा परिषदेने प्लॅस्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. यातच जिल्हा परिषदेने महात्मा गांधी जयंतीदिनी एका दिवशी जिल्ह्यात प्लॅस्टिकमुक्तीसाठी महाश्रमदान करीत तब्बल साडेसहा टन प्लॅस्टिक कचरा संकलित केला आहे.

गावागावांतील ग्रामपंचायतीकडे या कचऱ्याची साठवणूक करण्यात आली असून लवकरच त्यावर प्रक्रिया करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. 
महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारताची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी केंद्र सरकारने पाच वर्षांपूर्वीपासून स्वच्छ भारत अभियान हाती घेतले आहे. अभियानातून अपेक्षित स्वच्छतेसाठी समाजातील सर्व घटकांच्या योगदानातून स्वच्छता ही सेवा ही मोहीम राबविण्यात येत आहे. महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त यंदा या मोहिमेत प्लॅस्टिकमुक्तीसाठी पुढाकार घेण्यात येत आहे.

मोहिमेत कानाकोपऱ्यात साचलेला प्लॅस्टिक कचरा संकलित करून त्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांनी प्रभावी नियोजन केले आहे. या नियोजनातूनच त्यांच्या पुढाकारने महात्मा गांधी जयंतीदिनी जिल्हा परिषद व खासगी शाळांनी प्लॅस्टिकमुक्तीसाठी महाश्रमदान केले. यात विद्यार्थी व शिक्षकांनी प्रभात फेरी काढून प्लॅस्टिक कचरा संकलित केला. जिल्हाभरातील सर्व घटकांनी एक हजार 956 तास श्रमदान करीत सहा टन 688 किलो प्लॅस्टिक कचरा जमा केला आहे. यासाठी योगदान दिलेल्या अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांचे डॉ. ईटनकर यांनी कौतुक केले आहे. येत्या काळात सातत्याने अशी मोहिम राबवून प्लॅस्टिकमुक्त जिल्हा साकारण्याचा जिल्हा परिषदेचा मानस आहे. 
 
प्रक्रिया प्रकल्प उभारणार 
गावागावांत ग्रामपंचायतीने संकलित केलेला प्लॅस्टिक कचरा तालुक्‍यातील मोठ्या गावांत जमा केला जाणार आहे. मोठ्या गावांत चौदाव्या वित्त आयोगातून कचऱ्यावरील प्रक्रिया युनिट उभारण्यात येणार आहे. या प्रेसिंग युनिटमध्ये प्लॅस्टिक कचऱ्याची दबाई करून गठ्ठे करण्यात येणार आहेत. प्लॅस्टिक गठ्ठ्यांची हॉटमिक्‍स प्लॅंटला विक्री करून रस्ते दुरुस्तीसाठी डांबर उपलब्ध करण्याचाही डॉ. ईटनकर यांचा मानस आहे. या युनिटमधून कचरा प्रक्रिया व त्या गावच्या स्वच्छतेवरील खर्चासाठी निधी उपलब्ध करण्याचेही डॉ. ईटनकर यांचे प्रयत्न आहेत. 

"एनसाई'चे पहिले पाऊल 
रांजणीच्या (ता. कळंब) एनसाई साखर कारखान्याने प्लॅस्टिकमुक्त लातूरसाठी पुढाकार घेत एक लिटर दुधाच्या पिशवीमागे ग्राहकांना एक रुपयाची सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, महापालिका आयुक्त एम. डी. सिंग व कारखान्याचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महात्मा गांधी जयंतीदिनी या उपक्रमाचा प्रारंभ झाला आहे. उपक्रमात प्लॅस्टिकची एक लिटर दुधाची रिकामी पिशवी विक्रेत्याकडे जमा केल्यास ग्राहकाला एक रुपया सवलत देण्यात येणार असल्याचे श्री. ठोंबरे यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One and a half tons of plastic waste collected in one day