डोक्‍यात कोयत्याने वार करून एकाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

आडस येथील आठवडे बाजारात भरदुपारी येथीलच विलास लक्ष्मण गायकवाड याने हातात कोयता घेऊन दहशत माजवली.

केज (जि. बीड) - स्वतःच्या डोक्‍यात कोयत्याने वार करून घेऊन एकाने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (ता. 22) तालुक्‍यातील आडस येथे घडली. विलास लक्ष्मण गायकवाड (वय 43, रा. आडस, ता. केज) असे मृताचे नाव आहे. आठवडे बाजारात हा प्रकार घडला. 

तालुक्‍यातील आडस येथील आठवडे बाजारात भरदुपारी येथीलच विलास लक्ष्मण गायकवाड याने हातात कोयता घेऊन दहशत माजवली. त्यानंतर त्याने स्वतःच्याच डोक्‍यात कोयत्याने वार केले. पोलिसांनी गंभीर जखमी अवस्थेत त्याला अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल केले; परंतु तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आठवडे बाजार आणि जवळच एका मंदिरात सप्ताह सुरू असल्यामुळे प्रचंड गर्दी झालेली होती. कुठल्या तरी कारणावरून विलास वडिलांवर चिडलेला होता. त्यामुळे त्याने बाजारातील एका दुकानात विक्रीसाठी ठेवलेला कोयता उचलला आणि वडिलांवर उगारून त्यांचा पाठलाग सुरू केला. वडिलांनी कसाबसा जीव वाचवत गर्दीचा फायदा घेत तेथून पळ काढला. त्यानंतर संतप्त झालेल्या विलासने लोकांच्या अंगावर धावून जाण्यास सुरवात केली. त्यामुळे बाजारात दहशत निर्माण झाली. यानंतर त्याने स्वतःचे कपडेही फाडले.

जो कोणी समजूत घालण्यासाठी जवळ येईल, त्याच्यावर विलास धावून जाऊ लागल्यामुळे त्याला आवरणे अवघड झाले. याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली; परंतु विलास पोलिसांनाही जुमानेसा झाला. अखेर त्याने हातातील कोयत्याने स्वतःच्याच डोक्‍यात अनेक वार करून घेत स्वतःला गंभीर जखमी केले. वार खोलवर गेल्याने त्याचा मेंदू उघडा पडला होता; परंतु तशाही अवस्थेत त्याने लोकांना भीती घालणे चालूच ठेवले. अखेर पोलिसांनी इतर काही लोकांच्या मदतीने विलासचे हातपाय बांधले आणि रुग्णवाहिकेतून त्याला अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल केले. तेथे सायंकाळी सात वाजता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आठवडे बाजारात भरदुपारी विलासने अघोरी पद्धतीने आत्महत्या केल्याने शेकडो लोकांचा थरकाप उडाला होता. 

यापूर्वीही केले होते स्वतःला जखमी 
विलासने यापूर्वीही काहीवेळा स्वतःला गंभीर जखमी करून घेतले होते, असे समजते. एकदा तर त्याने दगडाने स्वतःची बोटे ठेचून घेतली होती, अशीही माहिती आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One commits suicide by hitting his head in the head