जनावराला वाचविताना अपघात ; एक ठार, तिघे जखमी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

तालुक्‍यातील फुलंब्री-राजूर रस्त्यावरील रांजणगाव येथील वडोबा पाटीजवळ दोन दुचाकींचा भीषण अपघात होऊन एकजण ठार, तर तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी (ता. चार) घडली. मृताचे नाव वाल्मीक परसराम निर्मळ (वय 54) असे आहे.

फुलंब्री (जि.औरंगाबाद) : तालुक्‍यातील फुलंब्री-राजूर रस्त्यावरील रांजणगाव येथील वडोबा पाटीजवळ दोन दुचाकींचा भीषण अपघात होऊन एकजण ठार, तर तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी (ता. चार) घडली. मृताचे नाव वाल्मीक परसराम निर्मळ (वय 54) असे आहे.

बुधवारी दुपारी दोन वाजता फुलंब्रीकडे जाणारी दुचाकी (एमएच 20, एएम 5194) व फुलंब्रीहून येणारी बुलेट (एमएच 20, ईसी 2266) यांचा रांजणगाव वडोबा पाटीजवळ अचानक रस्त्यावर आलेल्या जनावरांना वाचविण्याचा प्रयत्न करताना दुचाकींवरील ताबा सुटून समोरासमोर जोरात धडक झाली. यात दुचाकीवरील वाल्मीक निर्मळ (वय 54, रा. मुकुंदवाडी, औरंगाबाद) यांना जबर मार लागला. अपघाताची माहिती मिळताच फुलंब्री येथील महात्मा फुले क्रीडा रुग्णवाहिका चालक विजय देवमाळी यांनी अपघातस्थळी धाव घेऊन सर्व जखमींना प्रथम फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात व पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी दवाखान्यात दाखल केले.

मात्र डॉक्‍टरांनी वाल्मीक निर्मळ यांना तपासून मृत घोषित केले. त्यांची मुलगी योगिनी वाल्मीक निर्मळ (वय 16) ही जखमी झाली, तर बुलेटवरील अमोल किसनराव अंभोरे (वय 30) व त्याची आई शीला किसनराव अंभोरे (वय 60, रा. शिवेश्‍वर कॉलनी, मयूर पार्क) हेही जखमी झाले. फुलंब्री ते राजूर रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी शेतकरी आपली पाळीव जनावरे बांधून देतात. चरताना ही जनावरे रस्त्यावर येतात. त्यातच अनेक छोटे-मोठे अपघात नियमित होतात. बुधवारीसुद्धा या भीषण अपघाताला रस्त्याच्या कडेला बांधलेले जनावर अचानक रस्त्यावर आल्याने व त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकींचा ताबा सुटून हा अपघात झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One Die, Three Injured In Accident