अपघातात एक ठार; वाळूचे सात ट्रॅक्टर जप्त :  कुठे ते वाचा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 मे 2020

खरबडा (ता. गंगाखेड, जि.परभणी) येथील गोदावरी नदीपात्रात अवैधरीत्या वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळताच पोलिस प्रशासनाने रविवारी (ता. दहा) पहाटे पाच वाजेच्या दरम्यान कारवाई करून आरोपींविरोधात गुन्हे दाखल केले. 

गंगाखेड (जि.परभणी) : खरबडा (ता. गंगाखेड) येथील गोदावरी नदीपात्रात अवैधरीत्या वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळताच पोलिस प्रशासनाने रविवारी (ता. दहा) पहाटे पाच वाजेच्या दरम्यान कारवाई करून आरोपींविरोधात गुन्हे दाखल केले. या वेळी सात ट्रॅक्टर जप्त करण्यात आले.

गंगाखेड शिवराअंतर्गत येणाऱ्या खरबडा (ता. पूर्णा) या ठिकाणी असलेल्या गोदावरी नदीपात्रात अवैधरीत्या रात्री वाळूचा उपसा होत असल्याची गुप्त माहिती पोलिस प्रशासनास मिळाल्यानंतर पोलिस प्रशासनाच्या वतीने रविवारी पहाटे ५: २० मिनिटांनी छापा टाकला. या ठिकाणी सात ट्रॅक्टर वाळूने भरलेले आढळून आले. ज्याची किंमत ट्रॅक्टर व वाळूसह अंदाजे २,७१,८००० एवढी असून हा ऐवज पोलिस प्रशासनाच्या वतीने जप्त करण्यात आला. 

हेही वाचा व पहा : Video : परभणीला वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा

दोन आरोपींना अटक
यामध्ये दोन आरोपींना अटक केली, तर पाच आरोपींनी पोलिसांना पाहताच पळ काढला. तक्रारदार पोलिस नाईक राजेश रमेश म्हस्के यांच्या तक्रारीवरून गंगाखेड पोलिस ठाणे येथे आरोपी देविदास पिराजी माळगे, लिंबाजी रामकिशन माळगे , उमेश चव्हाण, प्रकाश चव्हाण, सचिन धोंडीराम माळगे, कृष्णा लांडे व एका अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक शेख करीत आहेत.
हेही वाचा ...

दुचाकी-कारच्या अपघातात एकजण ठार

जिंतूर (जि.परभणी) :  जिंतूर- बामणी रस्त्यावर बामणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अंगलगाव तांडा शिवारात रविवारी (ता.दहा) सकाळी नऊच्या दरम्यान, झालेल्या दुचाकी व कारच्या अपघातात दुचाकीस्वारचा मृत्यू झाला. शंकर गोविंदराव शिंदे (वय ५५, रा. अंबरवाडी, ता. जिंतूर) असे मयताचे नाव आहे.

सदर प्रकरणी कारचालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे समजते.
शेतकरी शंकर शिंदे हे दुचाकी ( एमएच २२ - एअर ७४८१) वरून जिंतूरकडे येत होते. त्याच वेळी विरुद्ध दिशेने भरधाव येत असलेली कारने ( एमएच २२ - एएम २०२१) दुचाकीला अंगलगाव तांडा शिवारात समोरून धडक जिल्याने अपघात झाला. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन पडले. अपघाताची माहिती समजताच त्यांचे नातेवाईक व ग्रामस्थांनी गर्दी केली.

हेही वाचा : रस्त्यात फसला लोडिंग ट्रक अन् वाहतुकीचा झाला खोळंबा

कारचालकास घेतले ताब्यात
या बाबत बामणी पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जख्मीला जिंतूर येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. मृत शिंदे यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, एक मुलगी व नातवंडे असा परिवार असून या याप्रकरणी दुपारपर्यंत पोलिसांत कोणतीही नोंद केली नसल्याची माहिती समजली. दरम्यान, अपघातग्रस्त कार एका राजकीय कार्यकर्त्याच्या नातेवाइकाची असून पोलिसांनी कारचालकास चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती समजते.
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One killed in accident; Seven tractors of sand seized Parbhani News