औरंगाबाद : तासाभरात दोन अपघात, एक ठार, दांपत्य गंभीर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

जळगाव रस्त्यावरील घटना, संतप्त नागरिकांनी फोडल्या बस, मोठा फौजफाटा 

औरंगाबाद - शहरातील जळगाव रोडवरील आंबेडकरनगर चौकात भरधाव खासगी बसच्या धडकेत एकजण ठार झाला. याच रस्त्यावर दुसऱ्या अपघातात दुचाकीस्वार दांपत्य गंभीर जखमी झाले. अपघातानंतर संतप्त जमावाने दगडफेक करून खासगी बसच्या काचा फोडल्या. यामुळे काही काळ येथे तणाव निर्माण झाला होता. हे अपघात सोमवारी (ता. 23)
सायंकाळी चार ते साडेपाचदरम्यान घडले. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, मोहम्मद सिद्दीक लियाकत अली शेख (रा. मिसारवाडी) सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास दुचाकीने बळीराम पाटील शाळामार्गे आंबेडकरनगर चौकातून पिसादेवीकडे जात होते. त्यावेळी कामगारांची वाहतूक करणाऱ्या खासगी बसची मोहम्मद सिद्दीक शेख यांच्या दुचाकीला धडक बसली. या भीषण अपघातात मोहम्मद सिद्दीक शेख
रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले. यानंतर सव्वातासाभरातच साडेपाचदरम्यान सिडको बसस्थानकाकडून हर्सूल टी पॉइंटकडे एक खासगी बस भरधाव वेगाने जात होती. त्यावेळी दुचाकीस्वार दांपत्याला या बसची धडक बसली. अपघातानंतर दांपत्य रस्त्यावर कोसळले. यात दांपत्याच्या पायावरून बसचे चाक गेल्याने दुचाकीस्वार दांपत्य गंभीर जखमी झाले. यानंतर त्यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

जमावाने फोडली बस 
जळगाव रस्त्यावर पाठोपाठ झालेल्या दोन अपघातांमुळे नागरिक संतप्त झाले. त्यांनी कंपनी कामगारांची वाहतूक करणाऱ्या बसवर दगडफेक सुरू केली. त्यामुळे दोन्ही चालकांनी बस सोडून तेथून पलायन केले. अचानक सुरू झालेल्या दगडफेकीमुळे आणि अपघातांच्या घटनांमुळे येथे काही वेळ तणाव होता. 
 
पोलिसांची मोठी कुमक 
अपघात व नंतर गोंधळाची माहिती समजल्यानंतर सिडको विभागाचे सहायक आयुक्त गुणाजी सावंत, निरीक्षक अशोक गिरी, निरीक्षक सुरेंद्र माळाळे, उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर यांच्यासह दंगा नियंत्रक पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करीत दगडफेक करणाऱ्यांना पांगविले. एका अपघातातील बसचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One killed, two seriously injured in accident at Aurangabad