औरंगाबाद : फॉगिंग मशिनच्या भडका, महापालिकेचा कर्मचारी भाजला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

आग कशी लागली ? 
फॉगींग मशीनला आग कशी लागली याविषयी अधिकृत माहिती मिळू शकली नाही. मात्र, अनेक वर्षांपासून महापालिका ही मशिन वापरत असून मशिनला आग लागल्याची ही पहिलीच घटना आहे. फॉगींग करताना पेट्रोलमध्ये औषध टाकून फवारणी केली जाते. त्यामुळे मशीनला धक्का लागल्याने ही घटना घडली असेल, असा अंदाजही डॉ. पाडळकर यांनी यावेळी
व्यक्‍त केला. 

औरंगाबाद - शहरात डेंगुसह साथीच्या आजाराचे रुग्ण वाढत असल्याने महापालिकेने धूरफवारणी मोहीम हाती घेतली आहे. हडको भागात आज (ता.23) सकाळी फवारणीचे काम सुरू असताना फॉगिंग मशिनने अचानक पेट घेतल्याने महापालिकेचा एक कर्मचारी यामध्ये जखमी झाल्याची घटना घडली. निवृत्ती वाघ (वय 52) असे त्याचे नाव आहे. वाघ यांना तातडीने
घाटी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले. 

शहरात गेल्या दोन महिन्यांपासून साथीच्या रोगाने थैमान घातले आहे. घरोघरी ताप, सर्दी, खोकला, डायरियाचे रुग्ण आढळून येत आहेत. याच वातावरणात डेंगुने नुकताच तिघांचा मृत्यू झाला. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील विविध भागात धूरफवारणी सुरू केली आहे. सोमवारी सकाळी पवन नगर वॉर्डात धूर फवारणीचे काम सुरू असताना हा प्रकार घडला. उपचारानंतर वाघ यांच्या प्रकृतीची माहिती घेतली असता त्यांची प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉ.पाडळकर यांनी सांगितले. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One person was injured in fire at Aurangabad