अतिताण जीवास ठरतोय घातक 

जालिंदर धांडे
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

बीड जिल्ह्यात तीन वर्षांत एक हजार 739 आत्महत्या घडल्या आहेत. ही आकडेवारी चिंतेत टाकणारी आहे.

बीड - विविध कारणांनी येणाऱ्या नैराशातून शेतकरी, युवक-युवती, विवाहित, वयोवृद्ध, नोकरदार मृत्यूला जवळ करीत असून, जिल्ह्यात 2016, 2017 व 2018 या वर्षात एक हजार 739 जणांनी आत्महत्या केल्या आहेत. सध्या जिल्ह्यात दिवसाला दोन जण आत्महत्या करीत आहेत. या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतच चालली आहे. 2016 मध्ये 523, 2017 मध्ये 610 व 2018 मध्ये 616 जणांनी आत्महत्या केल्या. जिल्ह्यात आत्महत्यांचा मुद्दा चिंतेचा विषय बनला आहे. 

युवकांच्या आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना यात आता नोकरदार विवाहित महिलांसह वयोवृद्धांचाही समावेश होत आहे. सध्याच्या धावपळीत प्रत्येक जण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहे. यात कामाचा ताण, मेहनत करूनही आलेले अपयश, कौटुंबिक वाद, उद्योगात आलेले अपयश, सर्व काही चांगले सुरू असताना आलेले संकट यासह इतर कारणांमुळे अनेक जण नैराश्‍यात जात आहेत. आता आपले सर्वच संपले आहे, आपल्याकडून काहीच होऊ शकत नाही यासह अनेक प्रश्‍नांच्या विवंचनेतून जिल्ह्यात अनेक जण आत्महत्या करत आहेत.

जीवनात एक रस्ता बंद झाला, तर दुसऱ्या ठिकाणी दहा रस्ते उघडे होतात. यामुळे तत्काळ निर्णय न घेता संकटाचा काळ जाऊ द्यावा व नंतर नव्या उमेदीने नव्या जोमाने जगण्याचा प्रयत्न करा, यश हे नक्कीच मिळणार, असा सल्ला मनोवैज्ञानिकांनी दिला आहे. 
 

नैराश्‍य आल्यास हे करा... 

  • मनाला खंबीर बनवा, जगण्याची जिद्द बाळगा 
  • दररोज किमान एक तास व्यायाम व योगासाठी द्यावा 
  • मनातील ताणाचे प्रश्‍न कुटुंबासह मित्रांसोबत शेअर करावेत 
  • अपयश आले तर खचू नका; नव्या उमेदीने मार्गक्रमण करा 
  • अपयश ही यशाची पहिली पायरी असते 
  • शरीराला पौष्टिक आहार द्यावा

 

 

आर्थिक परिस्थिती कमजोर होणे यासह इतर कारणांमुळे नैराश्‍यात जाऊन अनेक जण आत्महत्या करत आहेत; परंतु आत्महत्या हा शेवटचा पर्याय नाही. यामुळे प्रत्येकाने सकारात्मक विचार करून आलेल्या परिस्थितीतून मार्ग काढत जगण्याचा प्रयत्न करावा, यश नक्कीच मिळेल. 
-विजय कबाड, अपर पोलिस अधीक्षक, बीड. 

नैराश्‍य हे आत्महत्येचे मूळ कारण आहे. उदासीनतेचे प्रमाण वाढल्याने आत्महत्यांचे विचार मनात येतात. अशा व्यक्तीने जवळच्या व्यक्तीजवळ मन मोकळे करावे. जास्त नैराश्‍य आले असल्यास मानसोपचारतज्ज्ञांना भेटून योग्य सल्ला घेऊन औषधोपचार करण्याची गरज आहे. 
- डॉ. राजेश इंगोले, 
मानसोपचारतज्ज्ञ, अंबाजोगाई. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One thousand 739 suicides in three years in Beed district