पारध - भोकरदन तालुक्यातील अन्वा पाडा येथील गट क्रमांक ३८१ मधील एका स्टोन क्रशरवर काम करणाऱ्या तीन बांगलादेशियांना (ता. 27) डिसेंबर २०२४ नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथील दहशतवाद विरोधी पथक, पारध पोलिसांनी संयुक्त कारवाई करून अटक केली होती.
तर तिघांविरुद्ध पारध पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर भोकरदन फौजदारी न्यायालयाने नुकतीच या तिघांना एक वर्षाची कठोर शिक्षा सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये दोन सख्खे भाऊ हुमायून कबीर अली अहमद (वय-४०) आणि इमदाद हुसेन मोहम्मद अली अहमद (वय-३८, दोघेही मूळ रहिवासी काबिल मियारबारी, बिरनारायणपूर, काझीरखील तालुका, नोवाखली जिल्हा) यांचा समावेश आहे. या दोघांसोबत माणिक स्वान जन्नोदीन खान (वय-४२, मूळ रहिवासी व्यापारी मुन्शी कंदी, चारचांदा तालुका, शौकीपूर जिल्हा) यांचाही समावेश आहे. हे तिघेही बांगलादेशी नागरिक आहेत.
अवैध आधार कार्ड आणि इतर कागदपत्रेही बनवली -
हे तिघेही भोकरदन तालुक्यातील अन्वा पाडा येथील गट क्रमांक ३८१ आणि कुंभारी येथील स्टोन क्रशरवर काम करत होते. त्यांनी बेकायदेशीरपणे भारतात घुसखोरी करून बनावट आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे बनवली होती. त्यांनी भोकरदन शहरातील भारतीय स्टेट बँकेत खातेही उघडले होते.
या खात्याद्वारे ते अनेक वर्षांपासून बांगलादेशात पैसे पाठवत होते. तिघांवर वेगवेगळ्या कलमांनुसार गुन्हा दाखल करून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती.
या प्रकरणाचा तपास पारध पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी मोठ्या शिताफिने करून न्यायालयासमोर ठोस पुरावे सादर करून तपास पूर्ण केला. आणी ता. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी भोकरदन फौजदारी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
त्यानंतर ११, २०, २६ आणि २७ मार्च या प्रकरणाची सुनावणी झाली. काही तारखांना आरोपी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर झाले, मात्र (ता. २७) मार्च न्यायाधीशांनी त्यांना न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार (ता. १) एप्रिलला हे तिन्ही आरोपी भोकरदन न्यायालयात हजर झाले.
मंगळवारच्या सुनावणीत प्रथम वर्ग महिला न्यायाधीश आर. बी. पाटील यांच्यासमोर या तिघांनी आपला गुन्हा कबूल केला. या तिघांना जालन्याच्या कारागृहात एकत्र एक वर्षाची शिक्षा भोगावी लागणार आहे.
दोन वर्षांची शिक्षा एका वर्षात बदलली -
साधारणपणे या गुन्ह्यात किमान ५ वर्षांची शिक्षा होते, मात्र आरोपींनी गुन्हा कबूल केल्यामुळे त्यांना २ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. ही शिक्षा एकत्र करून केवळ एक वर्ष करण्यात आली. त्यापैकी तीन महिने त्यांनी आधीच तुरुंगात घालवले आहेत. त्यामुळे आता त्यांची नऊ महिन्यांची शिक्षा शिल्लक आहे. या प्रकरणात सरकारी वकील म्हणून अभय नारायण गवळी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
शिक्षा पूर्ण झाल्यावर बांगलादेशात परत पाठवले जाईल -
बेकायदेशीरपणे घुसखोरी करणाऱ्या या तिन्ही बांगलादेशी आरोपींची नऊ महिन्यांची शिक्षा पूर्ण झाल्यावर पारध पोलीस ठाणे नियमानुसार कारवाई करून त्यांना त्यांच्या मायदेशी बांगलादेशात परत पाठवणार आहे.
- संतोष माने, सहायक पोलिस निरीक्षक, पारध)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.