रेशन दुकानावर कांदा देण्याच्या हालचाली 

दिलीप पवार
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

अंकुशनगर -  सर्वसामान्यांच्या डोळ्याला पाणी आणणारा कांदा आता रेशन दुकानावर देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यानुसार एका शिधापत्रिकाधारकाला पाच किलो कांदा या प्रमाणे प्रत्येक तालुक्‍याला किती कांदा लागणार याची आकडेवारी जिल्हास्तरावरून घेण्यात येत आहे. त्यानुसार अंबडच्या तालुका पुरवठा विभागाने गुरुवारी (ता. पाच) ही आकडेवारी कळविली आहे, अशी माहिती पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार नंदकिशोर दांडगे यांनी दिली. 

 कांद्याच्या भावात विक्रमी वाढ 
रेशन दुकानात गहू, तांदूळ, साखर, तूर, हरभरा डाळीनंतर आता कांदा येणार असल्याने महागाईची झळ बसलेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. गत पंधरवड्यापासून कांद्याच्या भावात विक्रमी वाढ होत आहे. सध्या बाजारात कांदा सत्तर रुपयांपासून शंभर ते सव्वाशे रुपये प्रतिकिलो विक्री होत आहे. कांदा भाववाढीने सामान्य जनता व हॉटेलचालक त्रस्त आहेत.

हेही वाचा : मंगळसूत्र घेऊन विद्यार्थी पोचले ठाण्यात 

कांद्याच्या वाढत्या भावामुळे शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार जालना जिल्हा पुरवठा विभागाने प्रत्येक तालुक्‍यातील तहसीलदारांना पत्राद्वारे शिधापत्रिकाधारकांच्या संख्येनुसार तालुक्‍याला किती कांदा लागेल याची आकडेवारी मागविली आहे. यानुसार अंबड तालुक्‍यात 49 हजार 306 शिधापत्रिकाधारक आहेत. त्यानुसार प्रत्येक कार्डला पाच किलो याप्रमाणे तालुक्‍याला जवळपास अडीचशे टन कांदा लागणार आहे. अर्थात, स्वस्त धान्य दुकानांतील कांद्याचा भाव किती राहील याची उत्सुकता लागली आहे. 

स्वस्त धान्य दुकानात कांदे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जिल्हा पुरवठा विभागाने शिधापत्रिकाधारकांची माहिती मागविलेली आहे. त्यानुसार तालुक्‍यातील शिधापत्रिकाधारकांना लागणाऱ्या कांद्याची मागणी जिल्हा पुरवठा विभागाला पाठवली आहे. पुरवठा विभागाकडून कांदा उपलब्ध झाल्यास तो रेशन दुकानमार्फत वितरित करण्यात येईल. 
- राजीव शिंदे, 
तहसीलदार, अंबड 

स्वस्त धान्य दुकानात कांदा उपलब्ध झाल्यास तो सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात असावा. बाजारभावापेक्षा कमी किंमत असेल तरच शिधापत्रिकाधारक तो विकत घेतील. अर्थात, नागरिकांसाठी हा निर्णय दिलासा देणारा आहे. 
- अलका शिंगरे, 
ग्रामस्थ, वडीगोद्री 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion in ration shop