आता कांदा मिळणार ‘रेशन’वर !

कृष्णा पिंगळे
सोमवार, 9 डिसेंबर 2019

जिल्हापुरवठा अधिकाऱ्यांनी माहिती मागविली असून तहसीलदारांना पत्र दिले  आहे. मागणी नोंदविण्याची सुचना केली आहे.
 

सोनपेठ (जि.परभणी) : राज्यभर कांद्याचे दर वाढत असल्याने सरकारने आता कांदा रेशनवर देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्य शासनाने प्रत्येक तालुक्यात किती कांदा लागेल? याची माहिती मागविली आहे. या संदर्भात जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी तहसीलदारांना पत्र दिले असून मागणी नोंदविण्याची सूचना केली आहे.

या वर्षी आलेल्या नैसर्गिक संकटांमुळे राज्यातील खरीप कांद्यावर मोठे संकट आले आहे. अतिवृष्टीमुळे बहुतांश खरीप कांदा हातचा गेल्याने राज्यभर कांद्याचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच उन्हाळी कांद्याचा दर वीस हजार रुपये, तर खरिपातील कांद्याने ठोक बाजारात तेरा हजारांचा दर गाठल्याने किरकोळ बाजारात कांदा सत्तर ते शंभर रुपये किलो दराने मिळत आहे. राज्यभर कांद्याच्या दरवाढीची बोंब झाल्याने राज्यशासनाने कांदा रेशनवर पन्नास ते पंचावन्न रुपये किलो दराने देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून प्रत्येक तालुक्याला लागणाऱ्या कांद्याची माहिती मागविली आहे.

‘वरातीमागून घोडेच’ 
नवा कांदा येण्यास काही दिवस शिल्लक असतानाच राज्यशासनाचे रेशनवर कांदा उपलब्ध करून देण्याचे तुघलकी फर्मान म्हणज ‘वरातीमागून घोडेच’ असल्याचे ग्राहक व शेतकऱ्यांनी बोलून दाखवली आहे. राज्य शासनाने या बाबत सोमवारी (ता. नऊ) पत्र देऊन तहसीलदारांना मागणी नोंदविण्याची सूचना दिली आहे. या सर्व प्रक्रियेत किमान पंधरा दिवस जाणार असून तोपर्यंत बाजारात नवा कांदा येण्यास सुरवात होणार आहे. ग्रामीण भागातील तहसीलदारांकडून कांद्याच्या मागणीची माहिती मागवून सरकार नेमके काय साध्य करू पाहत आहे? शहरी भागात महाग झालेला कांदा ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणणारा असला तरी ग्रामीण भागातील ग्राहक मात्र, कांद्याच्या दरवाढीबाबत समाधानी असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

नव्या कांद्याचे दर निम्म्यापेक्षा कमी होतील
सोनपेठ येथील सोमवारच्या आठवडे बाजारात कांद्याचा दर साठ रुपये किलो, तर कांद्याच्या पातीचा दर तीस रुपये किलो होता. नागरिक मोठ्या आनंदाने पातीच्या कांद्याला पसंदी देत होते. तर आवश्यकतेनुसार वाळलेले कांदे घेण्यावर गृहिणींचा भर दिसून येत होता. दोन आठवड्यांत येणारा नवा कांदा बाजारात दाखल होईल. त्या वेळी कांद्याचे दर हे निम्म्यापेक्षा कमी होतील, असे आठवडे बाजारातील व्यापारी मोहम्मद बागवान यांनी सांगितले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onions will be available at cheap grain shops!